ठाणे जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेचे पालन; सहा हजार ७०४ पाेस्टर्सवर कारवाई
By सुरेश लोखंडे | Published: March 19, 2024 06:06 PM2024-03-19T18:06:45+5:302024-03-19T18:20:32+5:30
तिन्ही लाेकसभा मतदारसंघात लागलेली भूमिपूजन, उद्घाटनांच्या सहा हजार ७०४ पाेस्टर्स, बॅनर्सवर कारवाई केल्याची माहिती ठाणे जिल्हाधिकारी अशाेक शिनगारे यांनी दिली.
ठाणे : जिल्ह्यातील तिन्ही लाेकसभा मतदारसंघात लागलेली भूमिपूजन, उद्घाटनांच्या सहा हजार ७०४ पाेस्टर्स, बॅनर्सवर कारवाई केल्याची माहिती ठाणे जिल्हाधिकारी अशाेक शिनगारे यांनी दिली.
जिल्हाधिकारी कायार्लयात सर्व राजकीय पक्षांची बैठक शिनगारे यांनी घेतली. त्यांनी आचारसंहितेचे काटेकाेर पालन करण्याच्या सूचना पक्षांच्या सदस्यांना दिल्या. आचारसंहितेच्या काळात काय करावे, काय करू नये, नामनिर्देशन पत्र कसे भरावे, याबाबत पक्षांच्या प्रतिनिधींना मार्गदर्शन केले. निवडणूक खर्च निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे सादर करण्याचे आवाहन त्यांनी केले.
बैठकीला अपर जिल्हाधिकारी मनीषा जायभाये, मुख्य भूमी व भूमापन अधिकारी तथा आदर्श आचारसंहिता समन्वय अधिकारी विजयसिंह देशमुख, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम, तहसीलदार प्रदीप कुडळ, तहसीलदार उज्ज्वला भगत यांच्यासह संबंधित अधिकारी व विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक १९५०
लाच देणे, अवाजवी प्रभाव टाकणे, मतदारांना धाकदपटशा दाखविणे याबाबत काही तक्रारी असतील तर जिल्ह्याच्या तक्रार नियंत्रण कक्षातील १९५० या टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी. हा कक्ष २४ तास सुरू आहे, असे शिनगारे यांनी सांगितले. निवडणूक खर्चाबाबत नवी मुंबई महापालिकेचे मुख्य वित्त व लेखाधिकारी सत्यवान उबाळे आणि ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य वित्त व लेखाधिकारी वैजनाथ बुरडकर यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीस ठाणे महापालिकेचे मुख्य वित्त व लेखाधिकारी दिलीप सूर्यवंशी, स्थानिक निधी लेखापरीक्षा विभागाचे सहायक संचालक दीपक बोडके, जिल्हा कोषागार अधिकारी सुरेंद्र राऊत यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.