भ्रष्ट परिवाराच्या विरुध्द मशाल जिंकणार - आदीत्य ठाकरे यांचा विश्वास
By अजित मांडके | Published: May 18, 2024 05:11 PM2024-05-18T17:11:44+5:302024-05-18T17:12:15+5:30
ठाणे लोकसभेचे उध्दव सेनेचे उमेदवार राजन विचारे आणि कल्याणच्या वैशाली दरेकर यांच्या प्रचारार्थ ठाणे आणि कळवा, खारेगाव भागात प्रचार रॅली काढण्यात आली होती.
ठाणे : भ्रष्टपरिवार विरुध्द सामान्य नागरीक अशी लढत आहे, त्यामुळे या लढाईत मशाल जिंकणार असल्याचा विश्वास उध्दव सेनेचे नेते आदीत्य ठाकरे यांनी व्यक्त केला. ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, मुंबईतील सहा मतदारसंघ इतर ठिकाणी देखील मशालला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.
ठाणे लोकसभेचे उध्दव सेनेचे उमेदवार राजन विचारे आणि कल्याणच्या वैशाली दरेकर यांच्या प्रचारार्थ ठाणे आणि कळवा, खारेगाव भागात प्रचार रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत आदीत्य ठाकरे सहभागी झाले होते. तसेच त्यांच्या समवेत वरुण सरदेसाई, शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आदींसह इतर पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी हा विश्वास व्यक्त केला. ईशान्य मुंबईत भाजपच्या पदाधिकाºयाला पैसे वाटप करतांना आम्ही पकडले. मात्र पोलिसांनी उलट आमच्यावरच हल्ला आहे. त्यामुळे ही लढाई भ्रष्टपरिवार वाद गद्दार विरुध्द सामान्य नागरीक, निष्ठावान यांच्यात होत असल्याचेही ते म्हणाले. त्यांच्याकडे ईडी, सीबीआय, गुंडगिरी आहे. आमच्याकडे निष्ठावान सैनिक आहेत. त्यामुळे ठाण्याचा गडच काय कल्याणचा गडही आम्ही राखू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान आदीत्य यांनी सकाळी शक्तीस्थळावर जाऊन आनंद दिघे यांच्या स्मृतींना वंदन केले. त्यानंतर ते कळवा, खारेगाव या भागात गेले व प्रचार रॅलीत सहभागी झाले. दुसरीकडे ठाण्याचे उध्दव सेनेचे उमेदवार राजन विचारे यांची देखील बाईक रॅली काढण्यात आली. शक्तीस्थळापासून या रॅलीला सुरवात झाली. त्यानंतर महागिरी, सिडको, शांतीनगर, वागळे चेकनाका, साठे नगर, इंदिरानगर नाका, अंबिका नगर, राम नगर, यशोधन नगर, शास्त्रीनगर नाका, शिवाई नगर, वर्तकनगर नाका, लुईसवाडी, हाजुरी, बी कॅबीन, गोखले रोड, तीन पेट्रोल पंप आदींसह शहराच्या विविध भागातून ही बाईक रॅली गेली.
पाचव्या टप्प्यातील निवडणुकीचा प्रचार शिगेला पोचला असताना शनिवारी प्रचाराच्या तोफा थंड होण्या अगोदर महायुती आणि महाविकास आघाडीच्या जोरदार प्रचार सुरू असल्याचे दिसून आले. त्यातच ठाण्यातील टीप टॉप प्लाझा हॉटेल या ठिकाणी महायुतीचा मेळावा पार पडणार होता. त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या मेळाव्यात संबोधीत करणार होते. मात्र मेळाव्या आधी उध्दव सेनेची प्रचार रॅली या हॉटेलच्या बाजूने जात असताना ठाकरे गटाकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या प्रचार रॅलीत स्वत: राजन विचारे देखील प्रचारासाठी रॅलीमध्ये सहभागी झाले होते.
ठाणे लोकसभा मतदार संघात चांगला प्रतिसाद मिळत आहे. उन्हाचा पारा चढला असतांनाही भर उन्हात सर्व जण प्रचार रॅलीत सहभागी झाले आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकीत मतदार राजा यांना घरी बसविल्या शिवाय राहणार नाही, असं खासदार राजन विचारे म्हणाले.