युतीवर बोलण्यास आदित्य ठाकरे यांचे कानावर हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 06:00 AM2019-08-27T06:00:52+5:302019-08-27T06:01:35+5:30

आरोग्य विभागाचे कौतुक; ठाण्यात महाआरोग्य शिबिराचा शुभारंभ

Aditya Thackeray's hands to speak on the alliance | युतीवर बोलण्यास आदित्य ठाकरे यांचे कानावर हात

युतीवर बोलण्यास आदित्य ठाकरे यांचे कानावर हात

Next

ठाणे : शिवसेना आणि भाजपात युतीतील जागावाटपांबाबत चर्चा चांगलीच गरम झाली असून शिवसेनेचे नेते, मंत्री यावर बोलणे जाणीवपूर्वक टाळत आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी युतीच्या फॉर्म्युल्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावर ठाण्यात एका कार्यक्र मादरम्यान युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना छेडले असता, त्यांनी त्यावर बोलणे टाळले. यावरूनच युतीतील जागावाटपाबाबत अद्यापही भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा सुरू झाली आहे.


वैद्यकीय व दंत महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटनास ठाकरे ठाण्यात आले होते. या वेळेस त्यांना पत्रकारांनी युतीच्या जागावाटपाबाबत प्रश्न विचारला असता कोणतेही भाष्य न करता त्यांनी कानांवर हात ठेवले. आदित्य यांनी यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सुरुवातीला टाळ्या वाजवून विद्यार्थ्यांना साद घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, शाळेत जाता का? सुट्या घेता का? आजारी असल्यावर सुट्या घेता का? दांडी मारता का? असे प्रश्न करून जवळीक साधून आरोग्याची काळजी कशी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन केले.


दरम्यान, आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे गेल्या अनेक दिवसांपासून या आरोग्य शिबिरासाठी काम करत आहेत. शहरी भागाबरोबर ग्रामीण भागात आरोग्य सेवा तात्काळ पोहोचवण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर, पूरग्रस्त ठिकाणी आरोग्य खात्यामार्फत तत्परतेने काम झाले असल्यानेच आजपर्यंत एकही मृत्यू ओढवला नसल्याचे सांगून त्यांनी आरोग्य विभागाचे कौतुक केले. राज्यातील १६ ठिकाणी हे शिबिर आयोजित केले असून पुढील चार दिवस ते सुरू राहणार असल्याची माहिती शिंदे यांनी दिली. केवळ चारच दिवस हे शिबिर नसून या माध्यमातून जे उपचारासाठी दाखल होतील, त्यांच्यावर शस्त्रक्रिया किंवा इतर औषधोपचारही केले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.


यावेळी एकाच वेळेस राज्यातील १६ ठिकाणी डिजिटल पद्धतीने या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी गडचिरोली येथील सिटी स्कॅन सेंटरचा शुभारंभही करण्यात आला. राज्यातील इतर १५ शिबिरांच्या यावेळी आदित्य ठाकरे आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.



दोन तास विलंबामुळे विद्यार्थ्यांचे हाल
या महाआरोग्य शिबिराला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हजेरी लावणार होते. त्यामुळे डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. सकाळी १० वाजता या शिबिराला सुरुवात होणार होती. मात्र, हे दोन्ही नेते न आल्याने अखेर दोन तासांच्या विलंबानंतर आदित्य ठाकरे यांनी हजेरी लावली. त्यामुळे या शिबिराला आलेल्या शालेय विद्यार्थ्यांचे चांगलेच हाल झाले होते.

Web Title: Aditya Thackeray's hands to speak on the alliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.