आदर्श कारभार बघायला ठाण्याला या - आदित्य ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2018 03:46 AM2018-08-30T03:46:32+5:302018-08-30T03:47:14+5:30
पोलीस, राजकीय यंत्रणा आणि महापालिका प्रशासन एकत्र आल्यावर काय करूशकतात, याचे उत्तम उदाहरण म्हणजे ठाण्याचे द्यावे लागेल.
ठाणे : पोलीस, राजकीय यंत्रणा आणि महापालिका प्रशासन एकत्र आल्यावर काय करूशकतात, याचे उत्तम उदाहरण म्हणजे ठाण्याचे द्यावे लागेल. त्यामुळेच एक आदर्श कारभार बघायचा असेल तर ठाण्याला यावे, असे प्रसंगोद्गार बुधवारी शिवसेनेचे नेते तथा युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी येथे काढले.
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून कासारवडवली येथील कावेसर भागातील आरक्षित भूखंडावर दोन एकरांच्या परिसरात उभारलेल्या चिल्ड्रन ट्रॅफिक पार्कच्या लोकार्पणानंतर ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत महापौर मीनाक्षी शिंदे, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक, उपमहापौर रमाकांत मढवी, सभागृह नेते नरेश म्हस्के, स्थायी समिती सभापती राम रेपाळे, ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आदींसह हा प्रकल्प हवा, म्हणून ज्यांनी पुढाकार घेतला, त्या पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर उपस्थित होत्या. ठाणे शहरात राजकीय यंत्रणा, विकासक, पोलीस आणि पालिका प्रशासन यांच्या असलेल्या समन्वयातून अनेक प्रकल्प ठाणे शहरात सुरू असल्याचेही त्यांंनी सांगितले. दरम्यान, ट्रॅफिक पार्कच्या अनुषंगाने शहरात वाहतूककोंडी का होते, याची साधी कारणे आहेत. परंतु, ती सोडवणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. वाहतुकीचे नियम पाळणे गरजेचे असून अवजड वाहनांनी त्यांची लेन पाळल्यास अपघात आणि कोंडीही होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्लास्टिकबंदीबाबतही त्यांनी हा निर्णय भविष्याच्या दृष्टीने घेण्यात आला असून त्याचा आता त्रास होत असला, तरी पावसाळ्यात होणारी हानी यामुळे टाळता येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, त्यांच्या हस्ते नितीन कंपनी आणि मानपाडा उड्डाणपुलाखालील गार्डनचेही लोकार्पण करण्यात आले.
शहरात नव्याने खड्डे नाहीत
शहरात खड्डे पडले आहेत, हे खरे आहे. परंतु, ते नव्याने पडलेले नसल्याचा दावा आदित्य यांनी यावेळी केला.
पीडब्ल्यूडी, एमएसआरडीसी, पालिका प्रशासन आदींच्या रस्त्यांवर खड्डे पडले असून ते युद्धपातळीवर बुजवण्याचे काम पालिका प्रशासन आणि येथील स्थानिक राजकीय यंत्रणा करत असल्याचेही त्यांनी सांगितले.