Maharashtra Election 2019 :आदित्य उपमुख्यमंत्री झाल्यास आनंद होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 05:34 AM2019-10-17T05:34:48+5:302019-10-17T05:57:44+5:30

एकनाथ शिंदे यांची भावना : मंत्रीपदावर असलो, तरी मी सामान्य शिवसैनिकच लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : आदित्य ठाकरे गेली ...

Aditya will becomes Deputy Chief Minister then we will happy: Eknath shinde | Maharashtra Election 2019 :आदित्य उपमुख्यमंत्री झाल्यास आनंद होईल

Maharashtra Election 2019 :आदित्य उपमुख्यमंत्री झाल्यास आनंद होईल

googlenewsNext


एकनाथ शिंदे यांची भावना : मंत्रीपदावर असलो, तरी मी सामान्य शिवसैनिकच
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : आदित्य ठाकरे गेली १० वर्षे विविध घटकांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करीत आहेत. सत्तेच्या माध्यमातून सेवेची मोठी संधी त्यांना प्राप्त होते आहे. त्यांनी त्यांच्या जनआशीर्वाद यात्रेत कुठले पद हवे म्हणून निवडणूक लढवत नसल्याचा खुलासा केला आहे. परंतु, एक शिवसैनिक म्हणून माझी अशी इच्छा आहे, की आदित्य यांनी उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री व्हावे. तसे झाल्यास सर्वाधिक आनंद मलाच होईल, अशी भावना सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.
राजकारणात एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री होण्याची महत्त्वाकांक्षा आहे का?
शाखाप्रमुखापासून विरोधी पक्षनेते, कॅबिनेट मंत्रीपदापर्यंत माझा प्रवास झाला. कार्यकर्त्यापासून इथवर झालेल्या प्रवासामागे शिवसेना ही चार अक्षरे आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मला भरभरून दिले. स्व. आनंद दिघे यांचा आशीर्वाद लाभला. त्यांच्या निधनानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला सांभाळले. खूप काम करून मी पदांना न्याय दिला. मंत्री असलो तरी मी कार्यकर्ता म्हणून काम करतो.
ठाण्यात शिंदे यांच्याविरोधात राष्ट्रवादी सक्षम उमेदवार देत नाही. मुंब्रा-कळवा मतदारसंघात शिवसेना जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात तगडा उमेदवार देत नाही, हा मैत्री जपण्याचा प्रकार आहे का?
पक्ष, मैत्री आणि राजकारण या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. राजकारणात मी कधी मैत्री आड येऊ दिली नाही आणि मैत्रीत राजकारण आणले नाही. कळवा-मुंब्रा येथील शिवसेनेच्या उमेदवार दीपाली सय्यद यांना केवळ अभिनेत्री म्हणून उमेदवारी दिलेली नाही. त्यांचे महिला सक्षमीकरणाचे काम पाहून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संधी दिली आहे.
ठाणे जिल्ह्यात शिवसेनेला बंडखोरी रोखण्यात अपयश आले आहे की, भाजपने काही मतदारसंघांत बंडखोरी केल्यामुळे परस्पर अविश्वासातून बंडखोरी झालीय?
एखादा मतदारसंघ आपल्याला मिळावा, ही कार्यकर्त्यांची भावना असते. युतीमध्ये ती पूर्ण होत नाही. ज्यांनी निवडणुकीत बंड केले, त्यांची नाराजी पक्षावर नाही; तर स्थानिक उमेदवाराबद्दल असू शकते. त्याचा परिणाम अधिकृत उमेदवारांवर होणार नाही.
भाजपने कल्याण पश्चिम मतदारसंघ सोडला, पण बंड करून विश्वासघात केला का?
व्यापक हितासाठी युती करताना काही छोट्यामोठ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले पाहिजे. अनेक धोरणात्मक निर्णयांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात संवाद आहे. काही कार्यकर्त्यांना राजकारणात संयम नसतो. सर्वकाही त्यांना लवकर हवे असते. त्यातून अशा चुका होतात.
ठाण्यात मनसे व राष्ट्रवादीच्या छुप्या मैत्रीचे काय परिणाम होतील?
ठाणेकर कामाला पसंती देतात. त्यामुळेच गेली २५ वर्षे येथे सेनेची सत्ता आहे. मागील महापालिका निवडणुकीत साऱ्यांनी एकत्र येऊन शिवसेनेविरोधात प्रचार केला. तरीही, लोकांनी शिवसेनेला बहुमत दिले. त्यामुळे मनसे व राष्ट्रवादीबद्दल मला काही बोलायचे नाही.
भाजपने गणेश नाईक यांना ठाणे जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांना रोखण्याकरिता घेतले आहे का? भविष्यात शिंदे विरुद्ध नाईक संघर्ष पाहायला मिळेल का?
आता शिवसेना व भाजप युती आहे. त्यामुळे आमची लढाई कशी होईल? कुणापेक्षा आपण वरचढ व्हावे, कुणाला तरी हरवावे, या हेतूने मी काम करीत नाही. मी दिवसातील १८ ते २० तास काम करतो. माझ्यापेक्षा कुणी आणखी काम करून मोठे झाले, तर मला त्यात वावगे वाटत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसची परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे गेल्यावेळी नवी मुंबईत त्यांचा पराभव झाला. राजकारणात सक्रिय राहण्याकरिता मुख्य प्रवाहात राहिले पाहिजे, असे वाटल्याने ते भाजपत दाखल झाले असतील. परंतु, त्यामुळे आमच्यात संघर्ष होण्याचा किंवा माझे अस्तित्व कमी करण्याकरिता भाजपने त्यांना प्रवेश देण्याचा प्रश्न येत नाही.

Web Title: Aditya will becomes Deputy Chief Minister then we will happy: Eknath shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.