आदित्यचे ‘टॅब’स्वप्न भाजपा करणार साकार
By admin | Published: March 6, 2016 01:53 AM2016-03-06T01:53:29+5:302016-03-06T01:53:29+5:30
मागील वर्षभर ठाणे महापालिका शाळेच्या विद्यार्थ्यांच्या हाती टॅब देण्याचा मुद्दा महापालिका वर्तुळात चांगलाच गाजत आहे
ठाणे : मागील वर्षभर ठाणे महापालिका शाळेच्या विद्यार्थ्यांच्या हाती टॅब देण्याचा मुद्दा महापालिका वर्तुळात चांगलाच गाजत आहे. त्यात आता टॅबसाठी केलेली आर्थिक तरतूद अपुरी पडत असल्याने ती ३ कोटींची करण्यासाठी यंदाच्या आर्थिक वर्षात हालचाली सुरू झाल्या आहेत. परंतु, शिवसेनेने भाजपाला स्थायी समितीच्या चाव्या देण्याचे कमिटमेंट दिल्याने टॅबच्या वाढीव तरतुदीचा चेंडू थेट भाजपाच्या मैदानात येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. विशेष म्हणजे ठाणे महापालिकेच्या आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून भाजपा आता वर्षभर रखडलेला टॅबचा मुद्दा मार्गी लावून युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे स्वप्न साकारण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
मुंबई महापालिकेप्रमाणेच ठाणे महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांच्या हाती ते मिळावेत म्हणून स्थायी समिती सभापती नरेश म्हस्के यांनी यासाठी एक कोटींची तरतूद मागील वर्षीच्या अंदाजपत्रकात केली होती. दरम्यान, मागील महिन्यात झालेल्या महासभेत माजी महापौर अशोक वैती आणि स्थायी समिती सभापती नरेश म्हस्के यांनी याच आर्थिक वर्षात विद्यार्थ्यांच्या हाती ते पडावेत म्हणून महापौरांकडे मागणी केली होती. विशेष म्हणजे महापौरांनीच टॅबचा प्रस्ताव पुढील आर्थिक वर्षात घेण्याचे निश्चित केल्याचा आरोपही वैती यांनी केला होता. परंतु, नंतर महापौरांनीदेखील पुढील महासभेत हा प्रस्ताव मंजुरीसाठी आणला जाईल, असे स्पष्ट केले होते.