आदिवासी कोळी जमातीचे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर अन्नत्याग साखळी उपोषण
By सुरेश लोखंडे | Published: February 12, 2024 07:16 PM2024-02-12T19:16:31+5:302024-02-12T19:17:56+5:30
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय, कोर्ट नाका येथे छेडलेल्या आंदोलनाला महाराष्ट्र कोळी समाज संघाने पाठींबा जाहीर केला आहे.
ठाणे : कोळी महादेव, कोळी मल्हार, डॉगर कोळी, कोळी ढोर व टोकरे कोळी या अनुसूचित जमातिंच्या बाबत कोणताही ठाम निर्णय राज्य सरकार घेत नसल्याच्या आरोपाखाली येथील आदिवासी कोळी समाज समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली कोळी समाजाचा कार्यकर्त्यांनी राज्यस्तरीय अन्नत्याग साखळी उपोषण ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर सुरू केले आहे. त्यांच्या या राज्यव्यापी आंदोलन सहभाग घेऊन या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन सुरू केले आहे.
शासनाच्या या नाकरतेपणामुळे आदिवासी विकास विभागातील स्थलांतराची लॉबी बळकट होऊन ती बेकायदेशीर अनुसूचित जमाती प्रमाण पत्र तपासणी समितीच्या माध्यमातुन या कोळी आदिवासि जमातींवर गेली ४० ते ५० वर्षापासून अन्याय करीत असल्याच्या आरोपाखाली या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले आहे.. कोळी किंवा हिंदु कोळी अशा नोंदी असल्यातरी अर्जदार कोळी महादेव, कोळी मल्हार, डॉगर कोळी, कोळी ढोर, टोकरे कोळी या पैकी असल्यामुळे ते ज्या जमातीचा दावा करीत असतील त्यांना अनुसूचित जमातीची (एस.टी.) जात प्रमाण पत्रे व वैद्यता प्रमाण पत्रे मिळालीच पाहिजे ही मागणी या आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय, कोर्ट नाका येथे छेडलेल्या आंदोलनाला महाराष्ट्र कोळी समाज संघाने पाठींबा जाहीर केला आहे. साखळी आंदोलनाचे नेतृत्व दिपाली कोळी, महेंद्र चोघले, मधुकर कोळी, अविनाश शेखडकर यांच्याकडून करण्यात आले आहे. या वेळी साखळी आंदोलनात महाराष्ट्र कोळी समाज संघाचे अध्यक्ष जयेश ट तरे, माजी नगरसेवक राबोडी कोळीवाडा नागरिक संघटना अध्यक्ष संजय तरे, रविंद्र कोळी, भूपेंद्र गवते, अंकूश मढवी, मधुकर कोळी, निखील मोकाशी, वसंत पाटील गणेश भोईर, राजेश चोघले आदी उपस्थित होते.