...तर मंत्रालयात आत्मदहन! बिऱ्हाड मोर्चाचा इशारा; दोन तास रोखून धरला महामार्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2023 07:19 AM2023-06-16T07:19:35+5:302023-06-16T07:21:25+5:30
आदिवासी विकास विभागातील रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या मोर्चाने मुंबई-नाशिक महामार्ग रोखून धरला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क, कसारा: राज्यभरातील आदिवासी विकास विभागातील रोजंदारी कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांचा मुंबईत मंत्रालयाकडे निघालेला बिऱ्हाड मोर्चा गुरुवारी मुंबईच्या वेशीवर दाखल झाला. हा मोर्चा कसारा घाटात आला असताना अचानक मोर्चेकऱ्यांनी मुंबई - नाशिक महामार्गावरील दोन्ही मार्गिका तब्बल दोन तासांहून अधिक काळ रोखून धरल्या. त्यामुळे वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. सरकारने आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर आम्ही मंत्रालयात आत्मदहन करू, असा इशारा यावेळी मोर्चाच्या नेतृत्व करणाऱ्या रुपाली कंडोळे यांनी सरकारला दिला.
नाशिक येथील गोल्फ क्लब मैदान येथून बिऱ्हाड मोर्चाला मंगळवारी सकाळी सुरुवात झाली. शाळा व वसतिगृहातील रोजंदारी वर्ग तीन व वर्ग चार कर्मचाऱ्यांचा बिऱ्हाड मोर्चा आहे. कर्मचाऱ्यांच्या मोर्चाला सिटू संघटनेने पाठिंबा दिला आहे.
पोलिसांचा चोख बंदोबस्त
रस्ता रोकोनंतर शहापूर उपविभागीय पोलिस अधिकारी मिलिंद शिंदे, प्रभारी अधिकारी संदीप गिते यांनी मोर्चेकऱ्यांना रास्ता रोको मागे घेण्यास सांगितले. मात्र, मोर्चेकरी आंदोलनावर ठाम राहिले. हजारो मोर्चेकऱ्यांच्या सुरक्षेसाठी ठाणे ग्रामीण पोलिस, महामार्ग पोलिस घोटी, शहापूर केंद्रचे अधिकारी, कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.