पुलाअभावी जीव धोक्यात घालून आदिवासींची नदीतून ये-जा; समस्यांचा पाढा म्हणजेच पालघरमधील मोखाड्यातील मुकुंदपाडा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 01:24 PM2023-07-31T13:24:44+5:302023-07-31T13:25:09+5:30
निवडणुका आल्या की इकडे पुढारी मते मागायला येतात. एरव्ही इकडे कुणी ढुंकूनही बघत नाहीत, असे इथल्या स्थानिक आदिवासी लोकांचे म्हणणे आहे.
रवींद्र साळवे -
मोखाडा : देशाची आर्थिक राजधानी मुंबईपासून १०० किमी अंतरावर मोखाडा तालुक्यापासून ३५ ते ४० किमी अंतरावर दरी-डोंगरात बेरिस्ते ग्रामपंचायतीच्या हद्दीत आदिवासी लोकवस्तीचा वसलेला मुकुंदपाडा हा आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. पावसाळ्यात मुकुंदपाडावासीयांचा संपर्क तुटतो. यामुळे एखादा माणूस आजारी पडल्यास किंवा शाळकरी मुलांना, चाकरमान्यांना दुथडी भरून वाहणाऱ्या वाल नदीतून अक्षरश: जीवाची बाजी लावून ये-जा
करावी लागते.
निवडणुका आल्या की इकडे पुढारी मते मागायला येतात. एरव्ही इकडे कुणी ढुंकूनही बघत नाहीत, असे इथल्या स्थानिक आदिवासी लोकांचे म्हणणे आहे.
मुकुंदपाडा हा समस्यांचा पाडा असून, राज्यापासून तुटलेला आहे. आमच्याकडे रस्त्याची सोय नाही. रुग्ण असल्यास डोली करून आठ किमीचा डोंगर पार करून दवाखाना गाठावा लागतो. अत्यवस्थ रुग्ण अनेकदा रस्त्यातच दगावतात. पावसाळ्यात आमची समस्या अधिकच बिकट बनते. तालुक्याशी संपर्क तुटून जातो. रेशन आणायला आम्हाला जीवाची बाजी लावून नदी पार करावी लागते, असे येथील स्थानिक आदिवासी गणपत पांडू भोये यांनी सांगितले.
येथे वीज सोडली तर कोणत्याच सुविधा नाहीत. पाणी, रस्ता, आरोग्य अशा कोणत्याच सुविधा नसलेल्या या गावातील एखादी व्यक्ती आजारी पडली तर लाकडाची डोली करून तिला न्यावे लागते. वेळेत उपचार न मिळल्याने रुग्ण रस्त्यातच दगावतो. मागील आठ-दहा वर्षांत सहा रुग्ण उपचाराविना दगावले असल्याचे इथले लोक सांगतात.
पावसाळ्यात तर या पाड्यांचा तालुक्याशी संपर्कच राहत नाही. अनेक सरकारी योजना येथे कागदावरच आहेत. त्यांची अंमलबजावणी झालेली नाही.
स्वस्त धान्यासाठी ८ किमी पायपीट
या १२८ आदिवासी लोकवस्तीच्या मुकुंदपाड्यावर सोयीसुविधांचा अभाव आहे. शाळाही गेल्या पाच-सहा वर्षांपासून बंद आहेत. पाण्याची सोय नाही. त्यामुळे बारमाही नदीवरून खड्डा खोदून पाणी आणावे लागते. एवढेच काय, रेशन दुकानातील धान्य आणण्यासाठी आठ किलोमीटरचा भला मोठा डोंगर पार करून त्यांना चिकाडीचा पाडा गाठावा लागतो. बरे, एकाच फेरीत रेशन मिळेल याची शाश्वती नसते. यामुळे एका महिन्याचे धान्य आणण्यासाठी चार-पाच वेळा फेऱ्या माराव्या लागतात. पावसाळ्यात नदीच्या पलीकडे ये-जा करावी लागत असल्याने जीवघेणी कसरत करावी लागते.