कल्याण पूर्वेत पाण्याचा ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 01:58 AM2019-04-27T01:58:37+5:302019-04-27T01:59:03+5:30

खडेगोळवलीत टंचाईच्या झळा : तीन दिवसांनी रात्री येतो टँकर, पाण्यासाठी उडते झुंबड

Adjustment of water in welfare | कल्याण पूर्वेत पाण्याचा ठणठणाट

कल्याण पूर्वेत पाण्याचा ठणठणाट

Next

कल्याण : शहरातील काही भागांत पाणीटंचाईच्या झळा तीव्र होऊ लागल्या आहेत. पूर्वेतील खडेगोळवली गॅस कंपनी परिसरातील रामा व दत्ता कॉलनीतील नागरिक पाणीटंचाईने हैराण झाले आहेत. महापालिकेकडून दर तीन दिवसांआड या भागाला टॅँकरने पाणीपुरवठा होत आहे. हा टॅँकरही रात्री पाठवला जात आहे. टॅँकर येताच या परिसरातील नागरिक पाण्यासाठी अक्षरश: तुटून पडत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे रहिवाशांना टॅँकरच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे.

रहिवासी रामप्रसाद पांडे म्हणाले की, आमच्या भागात १५० लोक राहतात. त्यांच्या कॉलनीला पाणी येत नाही. या कॉलनीतील नागरिकांनी महापालिकेकडे पाणी येत नसल्याची तक्रार केलेली आहे. महापालिकेचे अधिकारी केवळ बोळवण करत आहे. त्याची दखल घेतली जात नाही. महापालिका तीन दिवसांआड एक पाण्याचा टँकर पाठवते. तोही रात्रीच्या वेळेत येत असल्याने नागरिकांची पाण्यासाठी तारांबळ उडते. केवळ पिण्यापुरते कसेबसे पाणी मिळते. रात्री पथदिव्यांच्या उजेडात महिला पाण्याच्या टँकरमधून पाणी मिळवण्यासाठी धडपड करतात. घरातील पुरुष व महिलांसह लहान मुलेही पाण्याचा टँकर आल्यावर एक हंडा पाण्यासाठी धाव घेतात. महापालिका टॅँकरने हे पाणी पुरवते. त्यासाठी शुल्क आकारले जात नाही. मात्र, एक टॅँकर पुरेसा नसून सकाळी आणि संध्याकाळी असे दोन टँकर रोज पाठवण्याची मागणी पांडे यांनी केली आहे.

कल्याण पूर्वेतील अनेक भागांत पाण्याची वानवा आहे. आता उन्हाळा अधिक कडक होत असून पाणीटंचाईचा त्रास मे महिन्यात आणखी वाढणार आहे. याठिकाणी पाण्याचा दाब कमी असल्यामुळे शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचत नाही. तर, महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून संबंधित विभागाला पाण्याचा टँकर पाठवला जात असल्याचे सांगण्यात येत आहे.

आजचे पाण्याचे शटडाउन रद्द
कल्याण-डोंबिवलीत २२ टक्के पाणीकपात लागू आहे. ही कपात मे महिन्यात वाढू शकते. लोकसभेची निवडणूक असल्याने या कपातीमधील वाढ तूर्तास तरी रोखून धरली आहे. निवडणुकीसाठी २९ एप्रिलला मतदान घेतले जाणार आहे. दरमहिन्याच्या चौथ्या शनिवारी कल्याण-डोंबिवलीचा पाणीपुरवठा बंद ठेवला जातो. मात्र, शनिवारी कल्याण-डोंबिवलीचा पाणीपुरवठा सुरळीत राहणार आहे. चौथ्या शनिवारचा शटडाउन रद्द करण्यात आला आहे. निवडणुकीमुळे मतदारांना हा दिलासा मिळाला असला तरी मतदानानंतर असाच दिलासा मे महिन्यात मिळणार की नाही, असा सवाल नागरिक करत आहेत.

साई श्रद्धा कॉलनीला दूषित पाणीपुरवठा
काटेमानिवलीतील साई श्रद्धा कॉलनीत राहणारे कैलास रोकडे यांनी सांगितले की, साई विहार कॉलनीच्या नळातून दूषित पाणीपुरवठा होत आहे. दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याप्रकरणी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे २४ नोव्हेंबर २०१८ रोजी तक्रार केलेली आहे. या तक्रारीची दखल घेतलेली नाही. या भागातील जलवाहिन्या गटारातून गेलेल्या असून त्या बदलल्याशिवाय हा दूषित पाण्याचा प्रश्न सुटणार नाही, असे रोकडे यांनी सांगितले. तसेच या भागाला कमी दाबाने पाणीपुरवठा केला जातो. पाण्याचा दाब कमी असल्याने चाळीतील लोक विजेचा पंप लावतात. चाळीच्या शेजारच्या इमारतीमध्येही विजेचे पंप लावले जातात. चाळीतील विजेच्या पंपांपेक्षा इमारतीमधील विजेचे पंप अधिक क्षमतेचे असल्याने इमारतीद्वारे पाणी जास्त खेचले जाते. त्यामुळे चाळींना पंप लावूनही पाणी मिळत नाही.

Web Title: Adjustment of water in welfare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.