प्रशासन- लोकप्रतिनिधींच्या भांडणात अर्थसंकल्प लांबणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 11:39 PM2020-02-24T23:39:06+5:302020-02-24T23:39:13+5:30
महापौरांचे प्रशासनाला पत्र; ३१ मार्चपूर्वी मंजूर करण्याची मागणी
ठाणे : गेल्या पाच वर्षांपासून अर्थसंकल्प जरी वेळेत सादर केला जात असला तरी त्याला मंजुरी मिळण्यासाठी आॅक्टोबर ते डिसेंबर महिना उगवत आहे. त्यामुळे यंदाचा अर्थसकंल्प हा ३१ मार्च पूर्वी मंजूर करावा यासाठी महापौर नरेश म्हस्के यांनी सुचना केल्या आहेत. परंतु, मागील आठवड्यात व्हॉट्सअॅपवरील मुद्दा चांगलाच रंगल्याने तो वेळेत सादर होईल का नाही, या बाबत शंका उपस्थित होत आहेत.
प्रशासन आणि लोकप्रतिनिधींतील वादामुळे यंदाचा अर्थसंकल्पही लांबणीवर पडण्याचे चित्र आहे. मागील काही वर्षे या ना त्या कारणाने ३१ मार्चपूर्वी अर्थसंकल्प मंजूर होऊनहीत्याची अंमलबजावणी होत नसल्यामुळे याचा विपरीत परिणाम नागरी सुविधा कामांवर होऊन नागरिकांचा रोष स्थानिक लोकप्रतिनीधीवर व्यक्त होतो. महापौर या नात्याने सर्व प्रश्नांना सामोरे जावे लागत असल्याचे म्हस्केयांनी नमूद करून २०२०-२१ चा अर्थसंकल्प ३१ मार्चपूर्वी मंजूर होईल, या दृष्टीने कार्यवाही करण्यासाठी लेखी प्रशासनाकडून सुरुवातीला अर्थसंकल्प स्थायी समितीला सादर केला जातो. त्यानंतर जवळजवळ तीन दिवस स्थायी समितीमध्ये त्यावर चर्चा होते. त्यानंतर अंतिम मंजुरीसाठी तो स्थायी समितीकडून महासभेत सादर केला जातो. महासभेतदेखील यावर तीन ते चार दिवस चर्चा होते. त्यानंतर त्यावर महापौरांचे शिक्कामोर्तब झाल्यानंतर प्रशासनाकडे पाठविला जातो. मात्र, त्याची अंमलबजावणी करायची की नाही, याचा अधिकार हा प्रशासनाला असतो. परंतु, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील वादामुळे मागील काही वर्षांत त्याच्या मंजुरीस आॅक्टोबर ते डिसेंबरचा कालावधी जात आहे. आतादेखील लोकप्रतिनीधी आणि प्रशासनात व्हॉट्सअॅपवरील मेसेजवरुन मागील आठवड्यात गदारोळ झाल्याने त्याचे परिणाम यंदाचा अर्थसंकल्प पुन्हा एकदा लांबणीवर पडण्यात झाले आहे.
आपण यापूर्वीच प्रशासनासह स्थायी समिती सभापतींनादेखील या संदर्भात पत्रव्यवहार करण्यास सांगितले आहे. त्यामुळे प्रशासनाकडून वेळेत अर्थसंकल्प सादर होईल, अशी अपेक्षा आहे.
- नरेश म्हस्के, महापौर, ठामपा
अर्थसंकल्प वेळेत स्थायी समितीला सादर करावा यासाठी आपण पत्रव्यवहार केला आहे. आता प्रशासनाने तो वेळेत सादर करावा जेणे करून विकास कामेदेखील वेळेवर मार्गी लागतील.
- राम रेपाळे, स्थायी समिती, सभापती - ठामपा