जिल्हा रुग्णालयातील ९० वर्षे जुनी सफाई कामगांराची चाळ हलविणार कोरोना पार्श्वभूमीवर प्रशासनाने घेतला निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2020 05:25 PM2020-04-06T17:25:03+5:302020-04-06T17:27:27+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालय परिसरात असलेल्या चाळीमधील नागरीकांना कोरोनाची लागण होऊ नये या उद्देशाने आता येथील ९० वर्षे जुनी चाळच हलविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार तसे आदेशही या चाळीतील रहिवाशांना देण्यात आले आहेत.
ठाणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवरठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय हे कोरोनासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. याठिकाणी रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, याठिकाणी असलेली सफाई कामगारांची ९० वर्षे जुनी चाळही येथून आता हलविण्याचा निर्णय सिव्हील प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार त्यांचे स्थलांतर आता घोडबंदर भागातील ब्रम्हाड येथे करण्यात येणार आहे. त्याठिकाणी येथील १६ कुटुंबांना घरे दिली जाणार आहेत.
जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधीतांचा आकडा वाढत आहे. तिकडे मुंबईतील रुग्णालयावर ताण येत असल्याने आरोग्य मंत्र्यांनी राज्यात इतर ३० ठिकाणी कोरोना रुग्णालय सुरु करावेत असे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने आता ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय हे आता खास कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी सज्ज करण्यात आले आहे. येथील १५० रुग्णांना महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात हलविण्यात आले आहे. परंतु जिल्हा रुग्णालयाच्या आवारातच सफाई कामगारांची ९० वर्षे जुनी चाळ देखील आहे. ब्रिटीशांनी या रुग्णालयाची सुरवात केल्यानंतर त्याचवेळेस येथे ही चाळही सफाई कामगारांसाठी उभारण्यात आली होती. परंतु आता कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता आता येथील ही जुनी चाळ हलविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. याठिकाणी राहणाऱ्या सफाई कामगारांना किंवा त्यांच्या घरच्यांना याची लागण होऊ नये यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला असल्याची माहिती जिल्हाशल्य चिकित्सक कैलाश पवार यांनी दिली. त्यानुसार आता या सर्वांचे घोडबंदर भागातील ब्रम्हाड भागात स्थलांतर करण्यात येणार आहे. या नवीन ठिकाणीच आता हे सफाई कामगार वास्तव्यास असतील असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.