पालिका निकालानंतर प्रशासनाचे खच्चीकरण
By admin | Published: May 12, 2017 01:47 AM2017-05-12T01:47:28+5:302017-05-12T01:47:28+5:30
महापालिका निवडणूक झाल्यापासून प्रशासनाचे सातत्याने खच्चीकरण करण्याचा प्रयत्न सुरू असून पालिका अधिकाऱ्यांवर होणारे हल्ले
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : महापालिका निवडणूक झाल्यापासून प्रशासनाचे सातत्याने खच्चीकरण करण्याचा प्रयत्न सुरू असून पालिका अधिकाऱ्यांवर होणारे हल्ले हे पूर्वनियोजित आहेत. राजकीय आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्या पाठिंब्याशिवाय हे शक्य नसल्याची टीका महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पत्रकारांकडे केली. फेरीवाले, राजकारणी व गुंड यांची साखळी तोडण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येईल, असा निर्धारही त्यांनी बोलून दाखवला.
महापालिका निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जयस्वाल यांना धमक्या आल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतरही महापालिकेत शिवसेनेची स्वबळावर सत्ता आली. त्यामुळे जयस्वाल यांच्या टीकेचा रोख शिवसेनेकडे असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
फेरीवाल्यांना रस्ते अडवून बसवण्यापासून ते त्यांच्याकडून घेतले जाणारे हप्ते आणि त्यांना वाचवणाऱ्या सर्व लोकांची यादीच तयार करण्यात येणार आहे. अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्यांनंतर संपूर्ण शहरभर व्यापक कारवाई करण्यात येणार असून सर्व राजकीय पक्षांकडून सहकार्याची अपेक्षा आहे, असे जयस्वाल म्हणाले. मात्र, कारवाई करताना कितीही राजकीय विरोध झाला, तरी या विरोधाला आता जुमानणार नाही, असा स्पष्ट इशारादेखील जयस्वाल यांनी दिला.
माळवी यांच्यावरील हल्ला व्यक्तीवरील हल्ला नसून पालिका प्रशासनावरील हल्ला असल्याचे त्यांनी नमूद केले. आता प्रशासनाविरोधात फेरीवाले असा सरळ संघर्ष सुरू झाला असून यापुढे मी स्वत: रस्त्यावर उतरून फेरीवाल्यांवर कारवाई करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. माळवी यांच्यावर जेव्हा हल्ला झाला, तेव्हा अनेक नागरिक तेथे उपस्थित होते. त्यांनी पुढे यायला हवे होते, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.