महापालिका रुग्णालयातील एचआयव्ही उपचार केंद्र बंद करण्याचा प्रशासनाचा घाट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 12:28 AM2019-05-28T00:28:48+5:302019-05-28T00:28:55+5:30

अ‍ॅण्टी रेट्रो व्हायरल थेरपीचे आसरा केंद्र मीरा रोड प्रभाग समिती कार्यालयासाठी बंद करण्याचा फतवा पालिकेच्या बांधकाम विभागाने काढला आहे.

Administration ghat to shut down the HIV treatment center in the municipal hospital | महापालिका रुग्णालयातील एचआयव्ही उपचार केंद्र बंद करण्याचा प्रशासनाचा घाट

महापालिका रुग्णालयातील एचआयव्ही उपचार केंद्र बंद करण्याचा प्रशासनाचा घाट

Next

- धीरज परब 

मीरा रोड : इंदिरा गांधी महापालिका रुग्णालयात केंद्र शासनामार्फत एचआयव्ही व क्षयरोगाची लागण झालेल्या रुग्णांकरिता सुरू असणारे अ‍ॅण्टी रेट्रो व्हायरल थेरपीचे आसरा केंद्र मीरा रोड प्रभाग समिती कार्यालयासाठी बंद करण्याचा फतवा पालिकेच्या बांधकाम विभागाने काढला आहे. दहिसरपासून बोईसरपर्यंतचे जवळपास चार हजार रुग्ण येथे उपचार घेत असताना लोकप्रतिनिधींचा हट्ट पुरवण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतल्याची टीका होत आहे.
मीरा रोडच्या पुनमसागर वसाहत परिसरात महापालिकेचे इंदिरा गांधी रुग्णालय, रक्तपेढी, शवागार, ग्रंथालयाची इमारत आहे. सदर ठिकाणी रुग्णालय असल्यानेच केंद्र शासनाच्या राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेमार्फत एचआयव्ही व क्षयरोगाची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार केले जातात. सदरचे रुग्ण गंभीर व संसर्गजन्य अवस्थेतील असल्याने रुग्णालय असेल, त्याच ठिकाणी हे केंद्र चालवले जाते.
२०१७ पासून शासनाचे एआरटी केंद्र येथील पहिल्या मजल्यावर सुरू असून सुमारे चार हजार रुग्ण उपचार घेतात. मीरा-भार्इंदरच नव्हे तर दहिसरपासून बोईसरपर्यंतचे रुग्ण या शासकीय केंद्रात उपचारासाठी येतात. येथे त्यांना मोफत औषधे, मोफत रक्तचाचणी व समुपदेशनासह विरंगुळा केंद्राची सुविधा आहे. बहुतांश रुग्ण हे गरीब, गरजू वा खाजगी रुग्णालयातील महागडे उपचार परवडत नसल्याने येथे येतात.
परंतु, सदर एआरटी केंद्र तातडीने बंद करून दुसरीकडे स्थलांतरित करण्याचा फतवा पालिकेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक खांबित यांनी वैद्यकीय आरोग्य विभागास दिला आहे. रसाझ येथील पालिकेचे प्रभाग समिती कार्यालय बंद करून ते गांधी रुग्णालयातील इमारतीत स्थलांतरित करण्याचा ठराव सत्ताधारी भाजपाने केला होता. त्या अनुषंगाने येथे असलेले शवागार बंद करण्याचा प्रयत्न झाला. परंतु, काँग्रेसचे जुबेर इनामदार यांच्यासह सेनेच्या नगरसेवकांनी त्यास विरोध केल्याने तूर्तास शवागार बंद करण्याचा प्रयत्न थंडावला. प्रभाग समिती कार्यालय रुग्णालयाच्या इमारतीत सुरू करायचेच, असा चंग सत्ताधारी भाजपने बांधल्याने पालिका प्रशासन त्यावर माना डोलावण्याचे काम करत आहे. तळ मजल्यावर प्रभाग समिती कार्यालय सुरू करायचे म्हणून तेथे असलेले ग्रंथालय बंद करून दुसऱ्या मजल्यावर हलवले आहे. रुग्णालय व पालिकेला जागा नसताना याच इमारतीत ग्रंथालयाजवळील जागा सत्ताधाऱ्यांच्या मंजुरीवरून हिंदी भाषिक कवी व साहित्यिकांना दिली आहे.
तळ मजल्यावर प्रभाग समिती सभापती व प्रभाग अधिकारी यांच्या दालनांचे काम जवळपास पूर्ण झाले असून अन्य कर्मचाºयांना बसण्यासाठी जागा हवी म्हणून पहिल्या मजल्यावरील एआरटी केंद्र बंद करण्याचा घाट घातला आहे. बांधकाम विभागाने तसे पत्र दिल्याने खळबळ उडाली आहे. आयुक्त बालाजी खतगावकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
>रुग्णालय व ग्रंथालयासाठी आरक्षित भूखंडावर हे केंद्र सुरू आहे. येथे प्रभाग समिती कार्यालय सुरू करणे रुग्णांसाठी गैरसोयीचे आहे. या प्रस्तावाला स्थायी समितीमध्ये विरोध केला होता. आयुक्त बालाजी खतगावकर यांना सांगूनही ते हतबल आहेत. मनमानीपणे काहीही निर्णय घेतले जात आहेत.
- जुबेर इनामदार, गटनेते, काँग्रेस, मीरा-भार्इंदर महापालिका
>महासभेच्या ठरावानुसार प्रभाग समिती कार्यालय स्थलांतरित करायचे असून कार्यालयासाठी जागा अपुरी पडत असल्याने एआरटी केंद्र हलवण्याचे पत्र दिले आहे. रामदेव पार्क येथे एआरटी केंद्र सुरू करता येईल. अडचण असेल तर संबंधित विभागाने कळवले पाहिजे.
- दीपक खांबित, कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग, मीरा-भार्इंदर महापालिका
>रसाझमधील प्रभाग समिती कार्यालय रुग्णालय-ग्रंथालयाच्या इमारतीत स्थलांतरित करण्याचा निर्णय आम्ही घेऊनही प्रशासनाने अजूनही सभापती, अधिकारी, कर्मचाºयांच्या दालनांचे काम पूर्ण केलेले नाही. येथे असलेले शवागार बंद करून भार्इंदर येथे पालिकेच्या शवागारात अजून हलवलेले नाही.
- दिनेश जैन, नगरसेवक, भाजपा
>शासनाच्या या महत्त्वपूर्ण उपचार केंद्राचा मोठ्या संख्येने रुग्णांकडून घेतला जाणारा लाभ आणि गरज पाहता कोणताही सारासार विचार न करताच बांधकाम विभागाने काढलेला हा फतवा संतापजनक आहे. रुग्णांच्या जीवाशी महापालिका प्रशासन व सत्ताधारी यांनी चालवलेला खेळ निंदनीय आहे. - सरिता नाईक, सामाजिक कार्यकर्त्या

Web Title: Administration ghat to shut down the HIV treatment center in the municipal hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.