प्रशासकीय मात केली : सत्ताकारणाचे काय?
By admin | Published: September 7, 2015 10:56 PM2015-09-07T22:56:01+5:302015-09-07T22:56:01+5:30
राज्य शासनाच्या या निर्णयामुळे भाजपाने शिवसेनेवर प्रशासकीय मात केली असली तरीही राजकीय पटलावर या निर्णयामुळे नेमके कोणाचे वर्चस्व सिद्ध होते, हे बघणे औत्सुक्याचे आहे.
डोंबिवली : राज्य शासनाच्या या निर्णयामुळे भाजपाने शिवसेनेवर प्रशासकीय मात केली असली तरीही राजकीय पटलावर या निर्णयामुळे नेमके कोणाचे वर्चस्व सिद्ध होते, हे बघणे औत्सुक्याचे आहे. सध्या कल्याण ग्रामीणमध्ये शिवसेनेचा आमदार असून बहुतांशी ग्रामपंचायतीही शिवसेनेकडेच आहेत. केवळ दोन ग्रामपंचायती भाजपाकडे आहेत. त्यामुळे या ठिकाणी भाजपाला एकहाती वर्चस्व मिळवतांना नाकीनऊ येणार आहे. या सर्वांमध्ये संघर्ष समितीची भूमिका महत्त्वाची ठरणार असून ते नेमके कोणाला सहकार्य करतात, ते महत्त्वाचे आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार संघर्ष समितीला वेगळी नगरपालिका, असा निर्णय देताना मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनानुसार त्या ठिकाणी भाजपाला सहकार्य करण्याचे सांगण्यात आले आहे. समितीनेही ते मान्य केल्याचे सांगण्यात आले. असे असेल झाले तर मात्र शिवसेनेची कोंडी होऊ शकते. त्यामुळे या निर्णयाचा सर्वाधिक फटका सेनेला बसेल, या भ्रमामध्ये भाजपाचे नेते आहेत. तर, शिवसेनेने मात्र याबाबत कोणतीही भूमिका अथवा प्रतिक्रिया न देता अळीमिळी गुपचिळी धोरण स्वीकारले.
पालकमंत्री भीमाशंकरला? : राज्य शासनाने घेतलेल्या या निर्णयासंदर्भात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. ते भीमाशंकरा गेले असून त्यांचा फोन लागत नसल्याचे सांगितले.
केडीएमसीत कोण बाजी मारणार? राज्य शासनाच्या या निर्णयामुळे केडीएमसीच्या निवडणुका वेळेवर होणार की नाही, हा पेच असून त्यात युती टिकेल की नाही, या चर्चेलाही उधाण आले आहे. एकीकडे भाजपा-शिवसेनेचे कार्यकर्ते-पदाधिकारी आणि नेतेही वेगळे लढण्याची भाषा करत आहेत. अनेक वॉर्डांमध्ये त्या दृष्टीने तयारीही करण्यात आली असून उमेदवारही निश्चित करण्यात आले आहेत. तसे झाल्यास इथे कोण बाजी मारणार, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
पालकमंत्र्यांना ठेवले अंधारात :
या निर्णयासंदर्भात शनिवारी झालेल्या बैठकीसह सोमवारच्या निर्णयापासूनही पालकमंत्र्यांना अंधारात ठेवले असल्याचे स्पष्ट झाले. डोंबिवलीत आज ते आले होते, तेव्हा २७ गावांबाबत त्यांनी भाष्य करत भाजपाला चिमटा काढला होता. मात्र, संध्याकाळीच हा निर्णय आल्याने त्यांना याबाबत काहीही माहिती नसल्याचे स्पष्ट झाले. शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रफुल्ल देशमुख यांनी याबाबत भाजपाचा महम्मद तुघलकी कारभार... अशा शब्दांत व्हॉट्सअॅपवर प्रतिक्रिया दिली. आता खुद्द भाजपामध्ये या निर्णयाच्या श्रेयासाठी साठमारी सुरू आहे. (प्रतिनिधी)