प्रशासन-शिवसेनेत समेट
By admin | Published: May 12, 2017 01:42 AM2017-05-12T01:42:39+5:302017-05-12T01:42:39+5:30
काही दिवसांपासून सत्ताधारी आणि पालिका प्रशासन यांच्यात सुरू असलेल्या वादावर अखेर गुरुवारी पडदा पडला. जिल्ह्याचे
लोकमत न्यूज नेटवर्क -
ठाणे : काही दिवसांपासून सत्ताधारी आणि पालिका प्रशासन यांच्यात सुरू असलेल्या वादावर अखेर गुरुवारी पडदा पडला. जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा समेट घडवून आणला. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिष्टाई करून शिवसेनेचे पालिकेतील पदाधिकारी आणि आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यात महापौरांच्या दालनात हा समेट घडवून आणला. या वेळी शहर विकासासाठी एकत्र येण्याचा निर्णय या बैठकीत झाल्याने सेना आणि प्रशासनामध्ये सुरू असलेल्या वादाला यानिमित्ताने पूर्णविराम मिळाला आहे. परंतु, यानंतर आता स्वीकृत आणि वृक्ष प्राधिकरण समितीचे मार्ग मोकळे होणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दुसरीकडे पालिका आयुक्त व शिवसेनेमध्ये समेट झाल्याने प्रशासनाच्या विरोधात दोन हात करण्यासाठी एकत्र आलेली राष्ट्रवादी आता एकाकी पडणार आहे.
मागील काही महिन्यांपासून आयुक्त आणि महापौर यांच्यात काही प्रकरणांवरून वितुष्ट निर्माण झाले होते. मनोरमानगर भागातील रस्ता रुंदीकरण रोखण्यावरून आयुक्त आणि महापौरांत वाद रंगला होता. त्यानंतर, प्रशासनाने वृक्ष प्राधिकरण सदस्यांच्या निवड रोखून स्वीकृत नगरसेवक निवडीतही खोडा घातला होता. त्यानंतर, वेगवेगळ्या मागण्या आणि माहितीची पत्रे सादर करून महापौरांकडून लेटरबॉम्ब फोडले जात होते. तर, आयुक्तांकडूनही सभागृह नेते आणि विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयाचे कामकाज थांबवण्यासारखे प्रकार घडले. सर्वसाधारण सभेचे ठराव प्राप्त झाल्याखेरीज कोणत्याही कामासाठी आर्थिक तरतूद करू नये, असे पत्र महापौरांनी पाठवल्यानंतर विकासकामांनाच ब्रेक लागतोय की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जुंपलेला हा वाद चिघळण्याची चिन्हे दिसत होती.
दरम्यान, पालकमंत्री शिंदे यांनी मध्यस्थी करून हा वाद गुरुवारी मिटवला. महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या दालनात आयुक्त संजीव जयस्वाल, उपमहापौर रमाकांत मढवी, सभागृह नेते नरेश म्हस्के आदी सेनेच्या पदाधिकऱ्यांची एक संयुक्त बैठक झाली. एकमेकांच्या कार्यपद्धतीबद्दल असलेल्या हरकती आणि आक्षेप दोन्ही बाजूंकडून मांडण्यात आले. त्यानंतर, अनेक ठिकाणी गैरसमजुतीमधून प्रकार वाढत गेल्याचेही या वेळी स्पष्ट करण्यात आले. परंतु, शहराचा विकास करायचा असेल, तर प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे असल्याचा सूरही या वेळी आळवण्यात आला.
ठाणेकरांनी आपल्याला शहराच्या विकासासाठी निवडून दिले आहे. आयुक्त जयस्वाल यांच्यासारख्या अधिकाऱ्याला बळ देऊन आपण हा विकास घडवायला हवा, असे शिंदे यांनी या बैठकीत स्पष्ट केले. त्यानंतर, एकमेकांवरचे रागलोभ विसरून एकदिलाने काम करण्याचा निर्णय या वेळी सत्ताधारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, सत्ताधारी आणि प्रशासन यांच्यात समेट झाल्याने स्वीकृत सदस्य आणि वृक्ष प्राधिकरण समिती सदस्यांच्या निवडीचा मार्ग मोकळा होणार का, हे पाहणेदेखील आता महत्त्वाचे ठरणार आहे. दुसरीकडे प्रशासनाविरोधात दोन हात करताना शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते एकमेकांसोबत होते.