अनधिकृत बांधकामांना प्रशासनाचे पाठबळ; महासभेत गंभीर आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2020 01:19 AM2020-12-19T01:19:03+5:302020-12-19T01:19:14+5:30
कारवाई करण्याचे महापौरांचे प्रशासनाला आदेश
ठाणे : ठाणे शहराच्या विविध भागांत अनधिकृत बांधकामे उभी राहत आहेत. फेरीवाल्यांचे प्रस्थ वाढले आहे. त्यावर कारवाई करण्याची मागणी केल्यानंतर सहायक आयुक्त सांगतात की, आम्हाला सौम्य कारवाई करण्याच्या सूचना आहेत. त्यामुळे अनधिकृत बांधकामांना आणि फेरीवाल्यांना पाठीशी कोण घालत आहे, असा सवाल शुक्रवारी सर्वपक्षीय नगरसेवकांनी महासभेत केला. कोरोना काळातही रात्रभर हुक्का पार्लर, बार सुरू असल्याची धक्कादायक बाबही यावेळी नगरसेवकांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या बार, हुक्का पार्लरसह अनधिकृत बांधकामे आणि फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचे आदेश महापौर नरेश म्हस्के यांनी प्रशासनाला दिले.
सौम्य कारवाई करण्याच्या सूचना सहायक आयुक्तांना कुणी केल्या आहेत, असा सवाल नगरसेविका मीनल संखे यांनी केला. हाच मुद्दा धरून मृणाल पेंडसे यांनी नौपाडा किंवा स्टेशन परिसरातही फेरीवाल्यांवर सौम्य कारवाई केली जाते. अधिकारी या फेरीवाले, तसेच अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालत आहे का, असा सवाल त्यांनी केला. अनधिकृत बांधकामे तर वाढत आहेतच, शिवाय शहरात रात्रीचे हुक्का पार्लर, बार राजरोसपणे सुरू असल्याची माहिती नगरसेवक भरत चव्हाण यांनी दिली. त्यांच्यावर का कारवाई होत नाही, असा सवालही त्यांनी केला. या संदर्भात एक समिती नेमण्याची मागणी नगरसेवक राम रेपाळे यांनी केली, परंतु समिती स्थापन करून उलट नगरसेवकच बदनाम होतात. त्याऐवजी शासन आदेशानुसार पालिकेने नव्याने उभ्या राहिलेल्या अनधिकृत बांधकामांची माहिती सभागृहासमोर आणावी, अशी मागणी नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी केली.
सौम्य कारवाईच्या सूचना नाहीत
सहायक आयुक्तांना सौम्य कारवाईबाबत प्रशासनाकडून कोणतेही आदेश नसल्याची माहिती अतिक्रमण उपायुक्त अशोक बुरपुल्ले यांनी सभागृहास दिली. तक्रारी आल्यानंतर तत्काळ कारवाई करण्याच्या सूचना केल्याचेही त्यांनी सांगितले. दुसरीकडे महापौर नरेश म्हस्के यांनी शहरात रात्रीच्या सुमारास जे काही बार, हुक्का पार्लर सुरू आहेत, त्यांच्यावर तत्काळ कारवाई करण्याची, तसेच अनधिकृत बांधकामे किंवा फेरीवाल्यांबाबत तक्रारी आल्या तर त्यांच्यावरही तत्काळ कारवाई करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले.