स्मार्ट सिटीच्या रखडपट्टीवरून प्रशासनाला धरले धारेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:43 AM2021-08-24T04:43:58+5:302021-08-24T04:43:58+5:30
ठाणे : स्मार्ट सिटीच्या माध्यमातून किती प्रकल्प पूर्ण झाले, केंद्राकडून किती निधी आला, नवीन स्टेशनची अद्यापही उभारणी का झाली ...
ठाणे : स्मार्ट सिटीच्या माध्यमातून किती प्रकल्प पूर्ण झाले, केंद्राकडून किती निधी आला, नवीन स्टेशनची अद्यापही उभारणी का झाली नाही, २०१२ मध्ये जी लोकसंख्या अपेक्षित धरली होती, त्यात आता किती पटीने वाढ झाली आहे, त्या अनुषंगाने या प्रकल्पात काही बदल केले आहेत का या व अशा मुद्द्यावरून स्मार्ट सिटीच्या सदस्यांनी सोमवारी झालेल्या बैठकीत महापालिका प्रशासनाला अडचणीत आणले. अखेर पुढील बैठकीत या सर्व प्रश्नांची लेखी माहिती दिली जाईल, असे आश्वासन देऊन प्रशासनाने वेळ मारून नेली.
सोमवारी महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात स्मार्ट सिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत विरोधी पक्षनेते शानू पठाण आणि काँग्रेसचे नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी स्मार्ट सिटीच्या कामांच्या सद्य:स्थितीचा अहवाल मागितला. नवीन स्टेशनचे कामकाज २०१२ पासून आजही अपूर्ण आहे. त्यावेळेस ठाणे आणि मुलुंडचा काही अंशी भार हलका होईल, असा दावा करण्यात आला होता. परंतु, आज २०२१ संपत आले तरीदेखील हा प्रकल्प सुरू झालेला नाही. त्यामुळे या मधल्या काळात जी लोकसंख्या वाढली, त्या अनुषंगाने प्रकल्पात काही बदल करण्यात आले आहेत का, असा सवाल चव्हाण यांनी केला. तसेच ठाणे पूर्वेकडील सॅंटीसबाबतही अशीच रखडपट्टी झाल्याने वाहनांची संख्या वाढली आहे. त्या अनुषंगाने त्याचे नव्याने नियोजन करण्यात आले आहे का, असा सवाल त्यांनी केला.
शानू पठाण यांनी पारसिक चौपाटीचे ७० टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित ३० टक्के काम पूर्ण करण्यात काय अडचण आहे, असा सवाल केला. तसेच इतर प्रकल्पांची कामे मार्गी लावण्याची मागणी त्यांनी केली. त्यानुसार या कामांची माहिती लेखी स्वरूपात पुढील बैठकीत दिली जाईल, असे आश्वासन प्रशासनाच्या वतीने देण्यात आले.
...........