मीरा भाईंदर महापालिका शाळांमधील डिजिटल वर्गातील शिक्षकांवर राहणार प्रशासनाची नजर
By धीरज परब | Published: October 23, 2022 06:47 PM2022-10-23T18:47:12+5:302022-10-23T18:47:45+5:30
मीरा भाईंदर महापालिका शाळांमधील डिजिटल वर्गातील शिक्षकांवर राहणार प्रशासनाची नजर असणार आहे.
मीरारोड : मीरा भाईंदर महापालिका दिवाळीच्या सुट्टी नंतर शाळांमध्ये ५० डिजिटल वर्ग सुरु करणार असून त्यात शिकवणाऱ्या शिक्षकांच्या कामावर प्रशासनाची नजर असणार आहे. मिरा भाईंदर महानगरपालिकेने दिलेल्या माहिती नुसार, पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी महानगरपालिका प्रयत्नशील आहे. शैक्षणिक दर्जा आणखी उंचावण्यासाठी महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले व सबंधित अधिकाऱ्यांच्या प्रयत्नाने दिवाळी सुट्टी नंतर ५० डिजिटल वर्ग सुरू करण्यात येणार आहे. या डिजिटल वर्गांत विद्यार्थ्यांना तंत्रज्ञाचा वापर करत नवनवीन माहिती ही चित्रफित, छायाचित्र स्वरूपात शिकवण्यात येणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांसाठी नवनवीन अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
सदर डिजिटल वर्ग हे मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू, गुजराती व सेमी इंग्रजी या भाषेत सुरू करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम किंवा एखाद्या विषयाबाबत पडणारे प्रश्न हे या डिजिटल स्वरूपाच्या माध्यमातून सहज सोडवता येणार आहेत. या डिजिटल वर्गांमुळे महानगरपालिका शाळां मधील विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर होणार आहे. या डिजिटल वर्गांच्या माध्यमातून शिक्षक व विद्यार्थी यांच्याशी थेट संपर्क साधता येणार आहे.
शिक्षकांना या डिजिटल वर्गांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे . यंत्रणेचा वापर कसा करावा, कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवावे याची माहिती प्रशिक्षणात शिक्षकांना मिळाली आहे. परंतु शिक्षकांनी या डिजिटल वर्गांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना काय शिकवले, शिक्षकाने किती वेळ विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी दिला याचा डाटा ऑनलाईन स्वरूपात जतन करण्यात येणार आहे. त्यामुळे शिक्षकांच्या गुणवत्ता व जबाबदारीवर प्रशासनाचे बारीक लक्ष असणार आहे. कामचुकारपणा करणाऱ्या शिक्षकांवर या मुळे कारवाईची टांगती तलवार राहणार आहे.