महापौर पालिकेत सतत ये-जा करतात, स्वतःला 'पालकमंत्र्यांचा दूत' म्हणतात!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 11:40 AM2022-03-23T11:40:06+5:302022-03-23T11:40:16+5:30

ठाणे महापालिका हद्दीत प्रशासकीय राजवट लागू झाली आहे.

Administrative rule has been implemented in Thane Municipal Corporation. | महापौर पालिकेत सतत ये-जा करतात, स्वतःला 'पालकमंत्र्यांचा दूत' म्हणतात!

महापौर पालिकेत सतत ये-जा करतात, स्वतःला 'पालकमंत्र्यांचा दूत' म्हणतात!

googlenewsNext

महापौर म्हणतात, मी पालकमंत्र्यांचा दूत-

ठाणे महापालिका हद्दीत प्रशासकीय राजवट लागू झाली आहे. त्यामुळे महापालिकेशी लोकप्रतिनिधींचा संपर्क तसा कमी झाला आहे. परंतु, असे असतानाही सध्या माजी महापौर नरेश म्हस्के हे पालिकेत सतत ये-जा करताना दिसत आहेत. शिवाय आयुक्तांच्या पाहणी दौरा आणि इतर ठिकाणीदेखील त्यांची हजेरी असल्याचे दिसत आहे. यावरूनच पालिकेत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. परंतु, मी पालकमंत्र्यांचा दूत असल्याचे म्हस्के सांगत आहेत. किंबहुना मी ठाणेकर नागरिक आणि प्रशासनामधील दूत म्हणूनच सध्या महापालिकेत येत आहे. लोकप्रतिनिधी नसलो तरी शहर आणि नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाची कामे असतात, नागरिकांचे प्रश्न असतात, ते सोडविण्याची जबाबदारी आजही आमची आहे. त्यामुळे हे काम कोणी तरी करणे अपेक्षित आहे. ते मी दूत म्हणून करीत असल्याचे ते सध्या सांगत आहेत. त्यामुळे या दूताची सध्या महापालिकेत चांगलीच चर्चा रंगली आहे.

कोरोनाची अजूनही धास्ती कायम-

कोरोनाच्या तीन लाटांवर नियंत्रण मिळविण्यात आरोग्य सेवा क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे योगदान न विसरण्याजोगे आहे. या काळात सर्वांनीच रात्रंदिवस मेहनत करून रुग्णसेवा दिली आहे. कोरोनाचे डेल्टा, ओमायक्राॅनसारख्या व्हेरिएंटवरही डॉक्टरांमुळेच मात करणे शक्य झाले. असे असतानाही एकदाही कोरोना न झालेले आरोग्य कर्मचारी मुख्यत: डॉक्टर अजूनही रुग्णसेवा देण्यास धास्तावत असल्याचे जे.जे. रुग्णालयातील एका वरिष्ठ डॉक्टराने सांगितले. आता कोरोना चाचणीची सक्ती काढली असल्याने रुग्णसेवा पूर्ववत होत आहे,  मात्र अजूनही कोरोनाची धास्ती डॉक्टरांच्या मनातून कमी झालेली नाही. काही देशांमध्ये कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढल आहे. दक्षिण कोरिया व चीनमध्ये पुन्हा लॉकडाऊन लागले आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईतही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मौखिक आरोग्याशी संबंधित उपचार करताना संसर्गाचा धोका असल्याने डॉक्टर अधिकच घाबरले आहेत.

माजी नगरसेवक अडवितात कामे-

नवी मुंबई महानगरपालिकेवर दोन वर्षांपासून प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व नगरसेवकांचा कार्यकाळ संपला आहे. परंतु अनेक राजकीय पदाधिकारी आताही स्वत:ला नगरसेवक म्हणवून घेत आहेत. प्रभागामधील कामांवर स्वत:चा हक्क सांगितला जात आहे. एक महिन्यापूर्वी ऐरोली विभागात एका माजी नगरसेवकाने सुशोभीकरण करणाऱ्या ठेकेदाराला काम करू दिले नाही. माझ्या कार्यकर्त्याला काम दिले पाहिजे, असा दबाव प्रशासनावर टाकला. माजी नगरसेवकाच्या दबावामुळे ठेकेदाराला काम थांबविण्यास सांगण्यात आले. अशाच घटना इतर  प्रभागांमध्येही घडत आहेत. मर्जीतल्या ठेकेदारास काम न दिल्यास कामे थांबविली जात आहेत किंवा कामाविरोधात तक्रारी केल्या जात आहेत. या माजी पदाधिकाऱ्यांना आळा कोण घालणार, अशी कुजबुज सध्या अनेक नागरिक करीत आहेत.

Web Title: Administrative rule has been implemented in Thane Municipal Corporation.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.