आरक्षणानुसार उमेदवार नसल्यास सरपंचाऐवजी प्रशासकीय राज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 01:06 AM2021-02-08T01:06:23+5:302021-02-08T01:06:32+5:30
सरपंचपदाचे आरक्षण : ‘पेसा’ गावात उमेदवाराची शक्यता कमी
ठाणे : जिल्ह्यातील तब्बल ४१८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण नुकतेच जाहीर झाले. त्यातून नुकत्याच निवडणुका पार पडलेल्या १५१ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची निवड जिल्ह्यात ८ व १० फेब्रुवारी या दोन दिवसांत होणार आहे. आरक्षणानुसार होणाऱ्या सरपंचपदाच्या निवडीसाठी संबंधित उमेदवार न मिळाल्यास सरपंचपदाची निवड प्रक्रिया पूर्ण होणार नाही. त्यामुळे संबंधित ग्रामपंचायतीवर सरकार प्रशासकाची निवड करून कामकाज पाहणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
जिल्ह्यातील मुदत संपलेल्या या ग्रामपंचायतींच्या एक हजार ४७२ सदस्यांसाठी या निवडणुका झाल्या आहेत. १५८ पैकी १४३ ग्रामपंचायतींच्या ९९४ सदस्यांसाठी मतदान झाले आहे. यासाठी दोन हजार ४१३ उमेदवारांनी नशीब आजमावले आहे. आठ ग्रामपंचायतींच्या ४१८ सदस्यांची बिनविरोध निवड आधीच झाली होती. उर्वरित पाच ग्रामपंचायतींच्या निवडणुकांवर बहिष्कार टाकल्यामुळे तेथे निवडणुका झाल्या नाही.
या गावांमध्ये पेच
जिल्ह्यातील ४३१ ग्रामपंचायतींपैकी ४१८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण काढले आहे. त्यापैकी आता १५१ ग्रामपंचायतींच्या सरपंचांची निवड आहे. निवडून आलेल्या एक हजार ४१२ सदस्यांपैकी ७८६ महिला आहेत; पण आरक्षणानुसार सरपंच असल्यामुळे बहुतांश ठिकाणी पेसा असलेल्या गावांमध्ये आरक्षणानुसार उमेदवार मिळण्याची शक्यता कमी आहे.
पुढे काय करणार
या ग्रामपंचायतींच्या निवडून आलेल्या सदस्यांमध्ये सरपंचपदाच्या आरक्षणास अनुसरून उमेदवार नसल्यास ग्रामपंचायत अस्तित्वात येणार नाही. त्यामुळे पुढील निवडणुकीपर्यंत ग्रामपंचायतींवर प्रशासक राज अस्तित्वात राहणार असल्याचे आतापर्यंतच्या अनुभवावरून राजकीय वतुर्ळात ऐकायला मिळत आहे.
बहुमत नसताना लॉटरी
जिल्ह्यात सर्वाधिक ७८६ महिला निवडून आलेल्या आहेत, तर ६२५ पुरुष विजयी झाले आहेत. पण, सरपंचपदाच्या आरक्षणानुसार जास्त सदस्य संख्या असलेल्या विरोधी गटात उमेदवार नसल्यास प्रतिस्पर्धी गटातील मागासवर्गीय उमेदवाराला सरपंचपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे. बहुतांश सदस्यांना अन्यत्र हलविण्यात आले आहे.