उल्हासनगर महापालिकेवर प्रशासकीय राजवट; महापौरांनी भावनिक होत मानले सर्वांचे आभार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2022 07:56 PM2022-04-04T19:56:49+5:302022-04-04T19:57:23+5:30
महापालिकेची मुदत ४ एप्रिलला संपल्यानंतर मंगळवारी ५ एप्रिल पासून प्रशासकीय राजवट लागू होणार आहे.
उल्हासनगर : महापालिकेची मुदत ४ एप्रिलला संपल्यानंतर मंगळवारी ५ एप्रिल पासून प्रशासकीय राजवट लागू होणार आहे. महापौर लिलाबाई अशान यांनी सोमवारी महापालिका अधिकारी, कर्मचारी, पत्रकार यांच्याशी संवाद साधून सर्वांचे आभार व्यक्त करून मन दुखावल्यास माफ करावे अशी भावनिक साद घातली.
उल्हासनगर महापालिकेच्या दुसऱ्यांदा महापौर झालेल्या लिलाबाई अशान यांना सर्व जण आई म्हणून हाक द्यायचे. त्यांनीही त्याच हाकेला होकार देऊन गेले अडीच वर्ष महापौर पदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली आहे. कोरोना काळात स्वतः रुग्णालय व शहराचा दौरा केल्याचे शहरवासीयांनी पाहिले आहे. सन २००७ व २०१९ साली त्या महापौर झाल्या असून त्यांनी विविध शहर विकास कामे केली. कोरोना महामारीच्या काळात नागरिकांना आरोग्य सुविधा मिळण्यासाठी २०० बेडचे खाजगी रुग्णलाय भाडेतत्त्वावर घेण्याचे धाडस केले. तसेच महापालिकेचे स्वतःचे २०० बेडचे सर्व सुविधयुक्त असे रुग्णालय अंटेलिया येथे उभे केले. त्याशिवाय व्हिटीसी मैदानात ५० कोटीच्या निधीतून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने क्रीडासंकुल, ऑक्सिजन प्लॅन्ट, कोरोना टेस्टसाठी लॅबोरेटरी, २०० कोटीच्या निधीतून विविध रस्ते, नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी मलनिस्सारण केंद्र आदी विकास कामे केली.
महापालिका प्रशासनाचा विरोध असतांना थेट मुख्यमंत्री व पालकमंत्री यांच्या दरबारी बाजू मांडून शेवटच्या १५ दिवसासाठी अभय योजना आणली. १५ दिवसात तब्बल ५३ कोटी तर साडे अकरा महिन्यात विभागाने फक्त ५७ कोटींची वसुली केली होती. महापौर लिलाबाई अशान या महापौरपदी असताना कधीही वादग्रस्त झाल्या नाही. तसेच त्यांच्यावर विरोधी पक्षाने एकदाही आरोप केला नाही. त्यांनी महापौर पदाच्या शेवटच्या दिवशी सर्वांचे आभार व्यक्त केले असले तरी, मी पुन्हा महापालिकेत निवडून येणार, असा विश्वास व्यक्त करून उल्हासनगरला उल्हासित करण्याचा प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
महापौरांच्या आधाराने कर्मचारी गहिवरले
महापौर लिलाबाई अशान यांनी दुपारी महापालिका महासभा कार्यालयात पालिका अधिकारी यांचे आभार व्यक्त केल्यावर, पत्रकारांना बोलावून आभार व्यक्त केले. तसेच तुम्ही समाजाचा आरसा असून त्यामध्ये खरे प्रतिबिंब उमटू द्या. अशी आशा ही त्यांनी व्यक्त केली. महापौरांच्या आभार प्रदर्शनाचे अनेक कर्मचाऱ्यांना गहिवरून आले तर, अनेकांच्या भावनांचा बांध फुटलेला दिसला.