केडीएमसीमध्ये प्रशासकीय खांदेपालट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2020 01:31 AM2020-01-06T01:31:05+5:302020-01-06T01:31:10+5:30

केडीएमसीत शनिवारी आयुक्त गोविंद बोडके यांनी खांदेपालट केले.

Administrative Shoulders at KDMC | केडीएमसीमध्ये प्रशासकीय खांदेपालट

केडीएमसीमध्ये प्रशासकीय खांदेपालट

Next

कल्याण : केडीएमसीत शनिवारी आयुक्त गोविंद बोडके यांनी खांदेपालट केले. डोंबिवलीचे ‘ह’ प्रभागक्षेत्र अधिकारी ज्ञानेश्वर कंखरे यांच्यावर बेकायदा बांधकाम प्रकरणात लाचखोरीचा गुन्हा दाखल झाल्यामुळे या विभागाचे उपायुक्तपद सुनील जोशी यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. या बेकायदा बांधकाम नियंत्रण विभागाची जबाबदारी मुख्य लेखापरीक्षक लक्ष्मण पाटील यांच्याकडे देण्यात आली आहे. तर, दोन महिन्यांच्या दीर्घ रजेवरून आलेले उपायुक्त विजय पगार यांच्याकडील महत्त्वाचा सामान्य प्रशासन विभाग काढून घेत त्यांच्याकडे मालमत्ता विभागासह अन्य विभागांची जबाबदारी देण्यात आली आहे.
सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त पगार हे दोन महिने रजेवर होते. या कालावधीत त्यांच्या विभागाचा कार्यभार परिवहन व्यवस्थापक मारुती खोडके प्रभारी म्हणून पाहत होते. शनिवारी आयुक्त बोडके यांनी केलेल्या खांदेपालटात पगार यांच्याकडील सामान्य प्रशासन विभागाचा कार्यभार काढून घेत खोडके यांच्याकडे या विभागाची अतिरिक्त जबाबदारी दिली आहे. पगार यांच्याकडील अग्निशमन विभागही खोडके यांच्याकडे दिला आहे. खोडके यांना आता परिवहनची जबाबदारी सांभाळण्याबरोबरच सामान्य प्रशासन, अग्निशमन, लेखा व लेखापरीक्षण आणि निवडणूक विभागाचेही काम करायचे आहे. उपायुक्त पगार यांच्याकडे मालमत्ता विभागासह विद्युत, भांडार, सुरक्षा, विभागीय उपायुक्तकल्याण पश्चिम, पाणीपुरवठा, जलनि:सारण व मलनि:सारण, बाजार व परवाना, आमदार व खासदार निधी, स्थानिक संस्थाकर, उद्यान, जनसंपर्क, मालमत्ताकर आदी विभाग देण्यात आले आहेत.
सुरक्षा आणि जनसंपर्क हा विभाग याआधी उपायुक्त खोडके यांच्याकडे होता, तर विभागीय उपायुक्त कल्याण पश्चिमची जबाबदारीउपायुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार दिलेल्या सहायक आयुक्त मिलिंद धाट यांच्याकडे होती. आता या तिन्ही विभागांचे कामकाज पगार पाहणार आहेत. मुख्य लेखापरीक्षक लक्ष्मण पाटील यांना उपायुक्तपदाचा अतिरिक्त पदभार देताना त्यांच्याकडे बेकायदा बांधकाम नियंत्रण या संवेदनशील विभागासह फेरीवाला हटाव विभागाचे नियंत्रण अधिकारी म्हणूनही जबाबदारी देण्यात आली आहे. हे दोन्ही विभाग आधी उपायुक्त सुनील जोशी यांच्याकडे होते. शिक्षण, वैद्यकीय, आरोग्य, महिला व बालकल्याण, दलित वस्ती सुधारणा व अल्पसंख्याक निधी, झोपडपट्टी निर्मूलन व सुधारणा, दक्षता व गुणनियंत्रण हे विभाग उपायुक्त मिलिंद धाट यांच्याकडे अबाधित ठेवताना त्यांना विभागीय उपायुक्त डोंबिवली पूर्व-पश्चिम विभाग ही जबाबदारी देण्यात आली आहे.
सहायक आयुक्त उमाकांत गायकवाड यांना आयुक्त कार्यालय विशेष कार्य अधिकारी आणि उपायुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवताना घनकचरा व्यवस्थापन (वाहतूक, संकलन, प्रकल्प), वाहन, भूसंपादन व पुनर्वसन, विभागीय उपायुक्त कल्याण पूर्व, वित्त आयोग निधी, नियोजन व विकास, विधी, संगणक व ई-गव्हर्नन्स आणि क्रीडा व सांस्कृतिक विभागाची जबाबदारी दिली आहे.
>आयुक्तांचे निर्णय चर्चेचा विषय
बेकायदा बांधकामसारख्या संवेदनशील विभागाची जबाबदारी महापालिकेतील अन्य उपायुक्त तसेच सहायक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे न देता ती मुख्य लेखा परीक्षकांकडे सोपवण्याची आयुक्तांची कृती चर्चेचा विषय ठरली आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये दिवसेंदिवस बेकायदा बांधकामांचा प्रश्न जटिल बनत आहे. त्यामुळे बेकायदा बांधकामविरोधी विभागाचा कार्यभार सक्षम अधिकाºयाकडे देणे अपेक्षित होते. मात्र, या विभागाच्या उपायुक्तपदाचा अतिरिक्त भार मुख्य लेखापरीक्षकांकडे देण्यात आल्यामुळे ते या जबाबदारीला कसा न्याय देतात, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

Web Title: Administrative Shoulders at KDMC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.