शहापूर तालुक्यातील ५५ ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:28 AM2021-07-18T04:28:23+5:302021-07-18T04:28:23+5:30
किन्हवली : शहापूर तालुक्यातील ५५ ग्रामपंचायतींचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर जिल्हा परिषदेने आपल्याच प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची प्रशासक म्हणून ...
किन्हवली : शहापूर तालुक्यातील ५५ ग्रामपंचायतींचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर जिल्हा परिषदेने आपल्याच प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केल्याने गावाचा कारभार पाहणाऱ्या सरपंच, उपसरपंच व सदस्यांना पदांवरून पायउतार व्हावे लागले आहे.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे अनेक निवडणुका स्थगित होऊन प्रशासनाकडे जबाबदारी देण्यात आली आहे. शहापूर तालुक्यातील ५५ ग्रामपंचायतींची पाच वर्षांची मुदत १३ ते २८ जुलैदरम्यान संपणार आहे. कोरोनाची दुसरी लाट काहीशी ओसरली असली, तरी प्रशासनाकडून निवडणुकीची कोणतीच तयारी करण्यात आलेली नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेने प्रशासक नेमण्याचा निर्णय घेतला. निवडणुकीच्या तयारीला साधारण चार महिन्यांचा कालावधी लागणार असून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात असल्याने हा निर्णय घेण्यात आलेला आहे. प्रशासक म्हणून शहापूर पंचायत समितीमधील शाखा अभियंता, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख यांच्या नेमणुकीचे आदेश काढले असून, रिक्त होणाऱ्या तारखेला त्यांना पदभार घ्यायचा आहे. सरपंचांना असलेले सर्व अधिकार प्रशासकांना बहाल केले असून, मावळते पदाधिकारी व गावपुढाऱ्यांशी जमवून घेण्याची कसरत त्यांना करावी लागणार आहे.
------
निवडणुकीच्या तयारीला वेळ लागत असल्याने तालुक्यातील ग्रामपंचायतीवर जिल्हा परिषदेने आपल्याच प्रशासनातील अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे.
- अशोक भवारी, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, शहापूर