ठाणे जिल्हा विवाह नोंदणी कार्यालयात एकावेळी एका जोडप्याला प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:41 AM2021-04-09T04:41:56+5:302021-04-09T04:41:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : सोमवारपासून राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले असून ठाणे जिल्हा विवाह नोंदणी कार्यालयात विवाहासाठी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : सोमवारपासून राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले असून ठाणे जिल्हा विवाह नोंदणी कार्यालयात विवाहासाठी येणाऱ्या जोडप्यांसाठीही कडक नियम लागू केले आहेत. यात एकावेळी एकाच जोडपे आणि त्यासोबत येणारे तीन साक्षीदार याशिवाय इतर नातेवाइकांना प्रवेश दिला जाणार नाही. तसेच, या कार्यालयात येण्याआधी जोडप्यांनी आधीच वेळ आरक्षित करणे बंधनकारक आहे.
कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता राज्य सरकारला संपूर्ण राज्यात कडक निर्बंध लागू करावे लागले आहेत. गेल्या वर्षी लॉकडाऊन झाल्यानंतर अनेकांना आपले विवाह. सोहळे रद्द करावे लागले तर काहींना पुढे ढकलावे लागले होते. लॉकडाऊनचे नियम शिथिल केले असले तरी गर्दी टाळण्यासाठी आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून विवाहसोहळ्यातील उपस्थितींवर मर्यादा आणण्यात आली. त्यामुळे अनेकांनी थाटात लग्नसोहळे पार पाडण्यापेक्षा नोंदणी पद्धतीने विवाह करण्याला पसंती दिली आणि त्याची संख्या लॉकडाऊन काळात मोठ्या प्रमाणात वाढली. परंतु, मार्च महिन्यात आलेली कोरोनाची दुसरी लाट पाहता पुन्हा एकदा कडक नियम लागू करावे लागले आहेत. विवाहसोहळ्यासाठी येणाऱ्या जोडप्यांना या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. त्यांना सोबत नातेवाईक आणता येणार नाही. गर्दी टाळण्यासाठी वधू, वर आणि तीन साक्षीदार यांनाच प्रवेश दिला जाईल. एका जोडप्याला विवाहाची कार्यवाही पूर्ण करण्यासाठी जास्तीत जास्त अर्धा तास दिला जाणार आहे. गर्दी टाळण्यासाठी विवाहेच्छुक जोडप्यांनी वेळेची आगाऊ नोंदणी करणे बंधनकारक आहे. एखाद्या जोडप्याने एक वेळ आरक्षित केल्यास दुसऱ्या जोडप्याला ती वेळ घेता येणार नाही. जोडप्यांना केवळ फोटो काढण्यापुरतेच चेहऱ्यावरील मास्क काढण्यास परवानगी देण्यात आली आहे. पक्षकारांनी स्वतःचे पेन वापरावे, इतरांकडे पेन मागू नये तसेच, कार्यालयात येताना दस्तऐवज आणि संबंधित कागदपत्रे याव्यतिरिक्त बॅग, पर्स नेण्यास मनाई करण्यात आली आहे, अशी माहिती विवाह नोंदणी कार्यालयाचे यादव यांनी दिली. या व इतर सूचनांची माहिती देणारे फलक विवाह कार्यालयाच्या बाहेरदेखील लावले आहेत.