अ‍ॅडमिशनचे टेन्शन!

By admin | Published: June 14, 2017 02:58 AM2017-06-14T02:58:29+5:302017-06-14T02:58:29+5:30

यंदाचा दहावीचा निकाल चांगला लागल्याने आणि ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्याची संख्याही घसघशीत वाढल्याने अकरावीच्या अ‍ॅडमिशनसाठी प्रचंड चुरस वाढण्याची

Admission Tension! | अ‍ॅडमिशनचे टेन्शन!

अ‍ॅडमिशनचे टेन्शन!

Next

- स्रेहा पावसकर/सुरेश लोखंडे । लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : यंदाचा दहावीचा निकाल चांगला लागल्याने आणि ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्याची संख्याही घसघशीत वाढल्याने अकरावीच्या अ‍ॅडमिशनसाठी प्रचंड चुरस वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सर्वच फॅकल्टींची (शाखांची) कट आॅफ लिस्ट तीन ते चार टक्क्यांनी वाढण्याची चिन्हे आहेत. अकरावीची अ‍ॅडमिशन जरी आॅनलाइन असली, तरी मेरीटमधील विद्यार्थ्यांनाही आपल्या पसंतीचे कॉलेज पहिल्याच फेरीत मिळण्याची शक्यता नसल्याचे प्रमुख कॉलेजमधील प्राचार्यांचे म्हणणे आहे.
यंदाचा सीबीएसईचा निकाल चांगला लागला. त्या पाठोपाठ एसएशसी बोर्डाचा निकालही घसघशीत लागला. त्यामुळे प्रवेशासाठीची चुरस प्रचंड वाढली आहे. ठाणे, डोंबिवलीतील अनेक विद्यार्थी मुंबईच्या कॉलेजला पसंती देतात. पण तेथील कट आॅफ लिस्टही साधारण चार टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज सीबीएसईच्या निकालापासून वर्तवला जात आहे. त्यात आता दहावीचा निकाल चांगला लागल्याने ठाणे जिल्ह्यातील कॉलेजमधील चुरसही कमालीची वाढली आहे. आपल्या पसंतीचे कॉलेज मिळवण्यासाठीचे टेन्शन शेवटपर्यंत कायम राहणार आहे.
दहावीच्या विद्यार्थ्यांनी निकालापूर्वीच आॅनलाईन अर्ज भरण्यास सुरु वात केली असली, तरी मंगळवारी निकाल लागल्यावर अनेकांनी प्रमुख महाविद्यालयांच्या गेल्यावर्षीच्या कट आॅफ लिस्टची शोधाशोध सुरु केली आहे. पसंतीनुसार विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचे क्र मांक द्यावे लागतात. मात्र आपल्या मार्कानुसार पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळेल की नाही? अशी धाकधुक त्यांच्या मनात आहे. पहिल्या नाही, दुसऱ्या नाही तर तिसऱ्या लिस्टमध्ये तरी आपल्याला संधी मिळेल का हे पडताळण्यासाठी अनेक जण संबंधित त्यात्या महाविद्यालयांच्या गेल्या वर्षीच्या कटआॅफ लिस्टची शोधाशोध करत आहे.
ठाण्यातील नामांकित महाविद्यालयांबरोबरच इतर कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्यांमध्ये शहराबाहेरील विद्यार्थ्यांची संख्याही मोठी असते.
विद्यार्थ्यांच्या वाढत्या गुणवत्तेबरोबरच दरवर्षी प्रत्येक महाविद्यालयाच्या तिन्ही शाखांच्या कट आॅफ लिस्टमधील टक्केवारीतही वाढच होते आहे.
यंदाचा जिल्हयाचा निकाल पाहता कट आॅफ कमी होऊन आपल्याला लवकर प्रवेशाची संधी मिळणार की यंदाही कट आॅफमध्ये वाढच होणार याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. गेल्यावर्षी अपवाद वगळता बहुतांशी महाविद्यालयांची अंतिम कट आॅफ लिस्ट ही ६० हून अधिक टक्के होती. कला शाखेत के. जी. जोशी महाविद्यालयाची शेवटची कट आॅफ लिस्ट ८५.८ तर ज्ञानसाधनाची ४४.४ टक्के इतकी होती.
विज्ञान शाखेत बांदोडकर कॉलेजची कट आॅफ ९१ टक्के होती. वाणिज्य शाखेसाठी बेडेकर महाविद्यालयाची ८५.८, तर त्या खालोखाल एनकेटी महाविद्यालयाची शेवटची कट आॅफ ६७.७ टक्के होती. त्यामुळे विद्यार्थ्यांचे लक्ष यंदाच्या पहिल्या कट आॅफ लिस्टकडे लागले आहे. दहावी विशेष /५

यंदा दहावीच्या निकालाचा टक्का वाढला. शंभर ते ९५ टक्क्यांदरम्यानच्या विद्यार्थ्यांची संख्याही कमालीची वाढली. त्यामुळे सर्वच फॅकल्टींच्या कट आॅफ लिस्टमध्ये तीन ते चार टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. ९० टक्के मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचेही प्रवेशाच्या पहिल्या यादीत चांगल्या कॉलेजमध्ये नाव येईल, याची शाश्वती देता येणार नाही.
- चंद्रशेखर मराठे, ज्ञानसाधना कॉलेज.

Web Title: Admission Tension!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.