अदानीच्या गुजराती वीजबिलावर मराठी एकीकरण समितीचा आक्षेप
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 04:45 AM2018-12-10T04:45:23+5:302018-12-10T07:00:18+5:30
कंपनीने ग्राहकांच्या सोईनुसार भाषा निवडीला प्राधान्य देत मीरा-भाईंदर शहरात गुजराती भाषेतील विद्युत बीले मोठ्या प्रमाणात वितरीत करण्यास सुरुवात केली.
भाईंदर : मुंबई उपनगरात सध्या अदानी इलेक्ट्रीसिटी या खासगी कंपनीमार्फत वीजपुरवठा केला जातो. या कंपनीने ग्राहकांच्या सोईनुसार भाषा निवडीला प्राधान्य देत मीरा-भाईंदर शहरात गुजराती भाषेतील विद्युत बीले मोठ्या प्रमाणात वितरीत करण्यास सुरुवात केली. त्यावर तीव्र आक्षेप घेत मराठी एकीकरण समितीने कंपनीच्या अधिकाऱ्यांची भेट घेत, विद्युत बीले केवळ मराठी भाषेतच काढावीत, अशी मागणी केली आहे.
शहरात अगोदरच मराठी टक्का घसरत असल्याची ओरड होत असली तरी, मराठी भाषेला प्राधान्य देण्यासाठी सरकारी यंत्रणा अनुत्सूक असल्याचे अनेकदा समोर आले आहे. त्यासाठी समितीने पुढाकार घेत अनेक सरकारी यंत्रणांतील परप्रांतीय भाषेच्या वापरावर आक्षेप घेत मराठी भाषेलाच प्राधान्य देण्यासाठी चळवळ सुरू केली. दरम्यान, मुंबई उपनगरात वीजपुरवठा करणारी पुर्वाश्रमीची रिलायन्स एनर्जी कंपनी ताब्यात घेतल्यानंतर अदानी इलेक्ट्रीसिटी कंपनीनेसुद्धा तोच पायंडा पाडण्यास सुरुवात केली आहे.
कंपनीने ग्राहकांना भाषा निवडीचे प्राधान्य देणे सुरू केल्याने परप्रांतिय भाषिकांकडून राज्यातील मराठी भाषा वापरावर गडांतर येण्याची भिती समितीने व्यक्त केली जात आहे. समितीने अदानीच्या या अमराठी भाषा निवडीच्या उपक्रमाला तीव्र विरोध केला आहे. कंपनीच्या या भाषा निवडीच्या उपक्रमामुळे मीरा-भाईंदर शहरात मोठ्याप्रमाणात गुजराती भाषेत विद्युत बीले वितरीत केली जात आहेत. शहरात मराठी भाषिक अस्तित्वात असताना आणि मराठी महाराष्ट्राची राजभाषा असतानाही या खासगी कंपनीने राजभाषा अधिनियमाचे उल्लंघन केल्याचा आरोप समितीने केला आहे. विद्युत बीलांवरील गुजराती भाषेवर तीव्र आक्षेप घेत समितीच्या मीरा-भाईंदर शहरातील शिष्टमंडळाने अदानी इलेक्ट्रीसिटी कंपनीच्या उत्तर विभागाच्या प्रमुख अधिकाºयांची भाईंदर येथील कार्यालयात भेट घेतली. त्यावेळी मराठी भाषेला प्राधान्य देण्याची मागणी शिष्टमंडळाने केली. त्यावर अधिकाºयांनी ७ दिवसांत वरीष्ठांशी चर्चा करुन कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन शिष्टमंडळाला दिले. शिष्टमंडळात मीरा-भाईंदर शहराध्यक्ष सचिन घरत, कार्याध्यक्ष प्रदीप सामंत, सचिव कृष्णा जाधव, पदाधिकारी प्रदीप जंगम, विभागीय अध्यक्ष अमित म्हात्रे, स्वप्निल तपासे आदींचा समावेश होता.