'दत्तक प्रक्रिया सुलभ होण्याची गरज'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 12:54 AM2019-06-16T00:54:59+5:302019-06-16T00:55:08+5:30
भिवंडीतून अपहरण झालेल्या आशिक हरजन या एक वर्षीय चिमुरड्याची अवघ्या आठ दिवसांत मोठ्या शिताफीने परराज्यातून सुखरूप सुटका केली आणि त्या अपहरणकर्त्याला जेरबंदही केले.
- पंकज रोडेकर
भिवंडीतून अपहरण झालेल्या आशिक हरजन या एक वर्षीय चिमुरड्याची अवघ्या आठ दिवसांत मोठ्या शिताफीने परराज्यातून सुखरूप सुटका केली आणि त्या अपहरणकर्त्याला जेरबंदही केले. आशिकच्या सुटकेची धाडसी कामगिरी बजावणारे ठाणे शहर पोलीस दलातील भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्याशी साधलेला संवाद.......
या गुन्ह्याचा शोध कसा लागला व त्यासाठी नेमके काय केले?
हा गुन्हा दाखल झाल्यावर सुरुवातीला भिवंडीतील पद्मानगर येथे चौकशीला सुरूवात केली. त्यावेळी तेथील नागरिकांशी बोलताना काही जण गुन्हा घडला, त्याचदिवशी उत्तरप्रदेशला गेल्याचे समजले. त्यामध्ये एक मराठी तरुण असल्याने त्याच्यावर संशय बळावला. सीसीटीव्हीतील फुटेजमध्ये दिसणाऱ्या तरूणाचे हावभाव त्याच्याशी मिळते-जुळते असल्याने संशय वाढला. त्यातूनच हा गुन्हा उघडकीस आणण्यात यशस्वी ठरलो.
आशिक उत्तर प्रदेशात असल्याने आरोपीला पकडण्यास स्थानिक पोलिसांचा कसा प्रतिसाद लाभला?
या गुन्ह्यातील आरोपी आणि ते बाळ उत्तर प्रदेशात असल्याचे स्पष्ट झाल्यावर एका सहायक पोलीस निरीक्षकासह पोलीस नाईक महिलेला तेथे पाठवले. त्यावेळी तेथील स्थानिक पोलिसांकडून चांगला प्रतिसाद लाभल्याने आशिकची सुटका आली आणि रोहित कोटेकर यालाही जेरबंद क रता आले.
अपहरणाच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी पालकांनी कशी काळजी घ्यावी?
दिवसेंदिवस या घटनांमध्ये वाढत होताना आपण पाहत आहोत. पण, आपल्या चिमुरड्यांचे अपहरण होऊ नये, यासाठी पालकांनी त्याला एकटे सोडू नये. त्यांनी त्याला आपल्या नजरेआड करू नये. त्यामुळे पुढे होणाºया त्रासाला सामोरे जाण्याची वेळ ओढावणार नाही.
कशामुळे हे प्रकार वाढले आहेत?
या घटनांचा अभ्यास केल्यास हे प्रकार प्रामुख्याने मूलबाळ होत नसल्याने वाढल्याचे दिसत आहे. याबाबत ठाणे शहर पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी अधिकाऱ्यांशी बोलताना, आपल्याकडील दत्तक प्रक्रिया खूपच किचकट आहे. ज्यांना मुले होत नाही, ते मुले दत्तक घेण्यास आसुरलेले असतात. पण, या प्रक्रियेमुळे मूल घेता येत नाही. त्यामुळे ही प्रक्रिया काही प्रमाणात शिथिल होणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितल्याचे राऊत म्हणाले.
एखादा हरवलेला चिमुरडा काही महिन्यांनी मिळाल्यावर त्याची ओळख कशी पुढे आणता?
जर एखादे बालक हरवल्यानंतर मिळाल्यावर तो नेमका आहे का, यासाठी एकच पर्याय आहे आणि तो म्हणजे डीएनएचा. त्यामुळे आधारकार्ड किंवा अन्य पर्याय तूर्तास तरी ग्राह्य मानला जात नसल्याचे तपासात दिसते.