सुल्झर कंपनी व्यवस्थापनाकडून अनुचित कामगार प्रथेचा अवलंब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:13 AM2021-03-13T05:13:23+5:302021-03-13T05:13:23+5:30
ठाणे: सुल्झर पंप्स प्रा. लि. या कंपनीच्या व्यवस्थापनाकडून सुल्झर एम्प्लॉईज युनियनच्या सभासद कामगारांविरुद्ध सुरू असलेल्या दडपशाहीची गंभीर दखल घेतानाच ...
ठाणे: सुल्झर पंप्स प्रा. लि. या कंपनीच्या व्यवस्थापनाकडून सुल्झर एम्प्लॉईज युनियनच्या सभासद कामगारांविरुद्ध सुरू असलेल्या दडपशाहीची गंभीर दखल घेतानाच कंपनी व्यवस्थापनाने अनुचित कामगार प्रथेचा अवलंब केल्याचे औद्योगिक न्यायालयाने अलीकडेच दिलेल्या निकालपत्रात म्हटले आहे. औद्योगिक न्यायालयाचा हा निर्णय या कामगारांच्या लढ्याचे मोठे यश असल्याचे मत सुल्झर एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष राजन राजे यांनी व्यक्त केले.
औद्योगिक वापरासाठी लागणाऱ्या पंपांचे उत्पादन करणाऱ्या नवी मुंबईतील दिघा येथील सुल्झर पंप्स प्रा. लि., या कंपनीच्या व्यवस्थापनाने चालविलेला अपप्रचार, बदनामी, पक्षपात आणि दडपशाही विरोधात सुल्झर एम्प्लॉईज युनियनने ठाण्याच्या औद्योगिक न्यायालयात दाखल केलेल्या दाव्यावर ५ मार्च २०२१ रोजी निकाल देताना कंपनी-व्यवस्थापनातील अधिकारी सुजल शहा, गुरुलाल उप्पल, अमित सिरोही यांंना न्यायालयाने खडेबोल सुनावले. न्या. ए. सुब्रमण्यम (सदस्य, ठाणे औद्योगिक न्यायालय) यांनी कंपनी व्यवस्थापनाने अनुचित कामगार प्रथेचा अवलंब करून युनियनच्या कामकाजात जाणीवपूर्वक हस्तक्षेप केला आहे. कंपनी-व्यवस्थापन, युनियन-नेतृत्वावर केवळ दोषारोप करून थांबलेली नसून, युनियनपासून जास्तीत जास्त सभासद तोडण्याचे गंभीर प्रयत्न करीत असल्याची टिप्पणी न्यायालयाने केली.
युनियनची आर्थिक कोंडी करण्याचा व्यवस्थापनाचा इरादा स्पष्ट दिसत असल्याचे न्यायालयाने म्हटले. युनियनचे सदस्यत्व सोडण्याला उत्तेजन देणे; तसेच एखाद्या युनियन-सदस्यांच्या विशिष्ट कंपूला थेट पाठिंबा देणे व त्यासाठी खास भत्ता देण्याचे आमिष दाखवणे, यासारख्या गंभीर बाबींमुळे कंपनी-व्यवस्थापनाचे युनियनवर संपूर्ण ताबा मिळविण्याचे सुप्त डावपेच असल्याचे निरीक्षण औद्योगिक न्यायालयाने नोंदविले आहे.
सर्वांनीच प्रचंड धैर्य, संयम, चिकाटी व सहनशीलता दाखविल्यानेच हा क्रांतिकारी न्यायालयीन निर्णय कामगार-कर्मचारी वर्गाच्या बाजूने लागलेला आहे. हा विजय आम्ही अतिशय नम्रतेनं स्वीकारीत आहोत.
-विनोद मोरे, सरचिटणीस, सुल्झर एम्प्लॉईज युनियन
...........