दत्तक घेण्याचे प्रमाण घटणार

By Admin | Published: May 2, 2017 02:43 AM2017-05-02T02:43:31+5:302017-05-02T02:43:31+5:30

मूल दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या पालकांना यापुढे एकच मूल दाखवण्याची नवीन नियमावली ‘चाइल्ड अ‍ॅडॉप्शन रिसोर्स अ‍ॅथॉरिटी’ने

Adoption will decrease | दत्तक घेण्याचे प्रमाण घटणार

दत्तक घेण्याचे प्रमाण घटणार

googlenewsNext

जान्हवी मोर्ये / डोंबिवली
मूल दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या पालकांना यापुढे एकच मूल दाखवण्याची नवीन नियमावली ‘चाइल्ड अ‍ॅडॉप्शन रिसोर्स अ‍ॅथॉरिटी’ने (कारा) १ मे पासून अमलात आणली आहे. मात्र, या नियमामुळे मूल दत्तक घेण्याचे प्रमाण घटणार आहे. ‘कारा’ने १ आॅगस्ट २०१५ पासून मूल दत्तक घेण्याची प्रक्रिया आॅनलाइन केल्यापासून हे प्रमाण काहीसे रोडावले आहे. तसेच पालकांच्या समुदेशनाला ब्रेक लागल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
डोंबिवलीतील ‘जननी आशीष’ ही संस्था १९९३ पासून कार्यरत आहे. तिथे निराधार मुलांचा सांभाळ केला जातो. या संस्थेची स्थापना कीर्तिदा प्रधान यांनी केली. वीणा दूत, जयश्री मोकाशी, शोभा केणी, सुलभा लोंढे आणि स्नेहल कर्णिक या संस्थेचे काम पाहतात.
मूल दत्तक प्रक्रियेचे काम संस्थेच्या कार्यकारी संचालिका जयश्री देशपांडे पाहतात. आतापर्यंत या संस्थेतून विविध विभागांतील दाम्पत्यांनी ४३७ मुले दत्तक घेतली आहेत. सध्या संस्थेत विविध प्रकारांत मोडणारी ५० मुले आहेत. मात्र, दत्तक देण्यासाठी मूल उपलब्ध नसल्याचे त्या म्हणाल्या.
‘कारा’तर्फे सुरुवातीला सहा मुले दाखवली जात होती. त्यानंतर, एक वर्षाने त्यांनी तीन मुले दाखवण्याचा नियम बनवला. आता १ मे पासून अमलात आलेल्या नवीन नियमानुसार एकच मूल दाखवले जाणार आहे. ते नाकारल्यास दुसरे मुले ३० दिवसांनी दाम्प्त्याला दाखवले जाणार आहे. त्यामुळे या प्रक्रियेला अधिक वेळ लागणार आहे. ‘कारा’च्या या निर्णयाबाबत संस्थेला रीतसर अजून कळवण्यात आले नाही. उद्यापर्यंत रीतसर मेल येईल, असे देशपांडे यांनी सांगितले.
‘कारा’च्या नियमावलीनुसार मूल दत्तक घेणाऱ्या दाम्पत्यांना तीन मुले दाखवली जात होती. मात्र, आॅनलाइन प्रक्रिया नसताना मूल दत्तक घेण्याचे प्रमाण जास्त होते. तसेच दाम्पत्य थेट संस्थांकडे येत असत. त्यामुळे त्यांच्या पसंतीनुसार त्यांना मूल दिले जात होते. त्यासाठी कायदेशीररीत्या कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक होते.
त्यावेळी दाम्पत्यांना समुपदेशन करण्याची संधी संस्थांना मिळत होती. मूल का दत्तक घ्यावे, त्याची काळजी कशी घ्यावी, यावर अधिक भर समुपदेशानात दिला जात होता. मात्र, मूल दत्तक घेण्याची प्रक्रिया आॅनलाइन झाल्याने समुपदेशनाच्या कार्यास ब्रेक लागला आहे. तसेच मूल दत्तक घेण्याची प्रक्रिया मंदावली आहे, असे देशपांडे म्हणाल्या.

अनेकांकडून कागदपत्रांची योग्य पूर्तता नाही

आमची संस्था ‘कारा’ची नियमावली फॉलो करते. त्यामुळे आॅनलाइन प्रक्रियेचे उल्लंघन करून आम्ही मूल दत्तक देत नाही. अनेक दाम्पत्ये योग्य प्रकारे कागदपत्रांची पूर्तता करत नाहीत. त्यामुळे त्यांना मूल दत्तक देण्यास नकार दिल्यावर ते अनेक प्रश्न विचारतात. दाम्पत्यांनी त्यांचे प्रश्न ‘कारा’कडे विचारायला हवेत.
आॅनलाइन प्रक्रियेमुळे समुपदेशनाला ब्रेक बसल्याने मूल दत्तक घेण्यासाठी तयारी दर्शवणारी दाम्पत्ये अनेकदा गोंधळलेली दिसतात. त्यांची मन:स्थिती अनेकदा द्विधा असते.

‘कारा’ने केलेला नियम हा निसर्गाशी सुसंगत असल्याने त्यावर काही भाष्य करता येत नसल्याचे देशपांडे यांनी स्पष्ट केले.

नवीन नियमानुसार एकच मूल दाखवले जाणार आहे. ते नाकारल्यास दुसरे मुल ३० दिवसांनी दाम्प्त्याला दाखवले जाईल.

Web Title: Adoption will decrease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.