कोंडीवर ‘उन्नत’चा उतारा; भाईंदर पश्चिमेसाठी पूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 10:48 PM2019-11-17T22:48:43+5:302019-11-17T22:48:51+5:30
जागेची सरनाईक, अधिकाऱ्यांकडून पाहणी
भाईंदर : मीरा-भाईंदर मेट्रोचे काम सुरू झाल्यामुळे सध्याची तसेच भविष्यातील होणारी वाहतूककोंडी पाहता त्यावर उन्नत मार्ग बांधण्याची मागणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी केल्यानंतर त्या अनुषंगाने एमएमआरडीए व महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या प्रस्तावित मार्गाची पाहणी केली. मेट्रो मार्गासह प्रस्तावित उन्नत पूल हा काशिमीरा नाकयापासून भार्इंदर जुने फाटक ओलांडून भार्इंदर पश्चिमेला नेल्यास वाहतूककोंडी फुटेलच, पण पश्चिमेसाठी आणखी एक पर्यायी पूल उपलब्ध होणार असल्याचे सरनाईक म्हणाले.
काशिमीरा नाकयापासूनच्या मुख्य छत्रपती शिवाजी महाराज मार्गावरून भार्इंदर पश्चिम, मॅक्सस मॉल येथे मेट्रोचे काम सुरू झाले आहे. शिवसेनेने यासाठी सातत्याने केलेली आंदोलने, पाठपुरावा व विधिमंडळातही मुद्दा मांडल्याने मीरा-भार्इंदर मेट्रोचे काम सुरू झाल्याचे सरनाईक म्हणाले. पण मेट्रोचे काम सुरू झाल्याने या मुख्य मार्गावर तसेच सात प्रमुख नाक्यांवर वाहतूककोंडी होत आहे.
भविष्यात कोंडी आणखी वाढणार असून मेट्रो सुरू झाली तर वाढत्या लोकसंख्येनुसार वाहने व कोंडी वाढेल. त्यामुळे मेट्रोसह वाहतूककोंडीचे आतापासूनच नियोजन करण्याचा प्रयत्न आहे. या मार्गावर केवळ दोन नाक्यांवरच उड्डाणपूल बांधण्याचे ठरले होते. पण त्याने काहीच उपयोग होणार नसल्याने त्यासाठी एकच उन्नत मार्ग बांधावा, अशी मागणी पुन्हा एमएमआरडीएच्या अतिरिक्त महानगर आयुक्त डॉ. सोनिया सेठी यांच्या दालनात झालेल्या बैठकीवेळी केली होती.
त्यावेळी सेठी यांनी उन्नत कसा उभारला जाऊ शकतो व त्याची उपयुक्तता यासाठी एमएमआरडीएच्या अधिकाºयांना पाहणी करुन अहवाल देण्यास सांगितले होते, असे सरनाईक म्हणाले. त्या अनुषंगाने एमएमआरडीएचे अतिरिक्त मुख्य अभियंता, उपअभियंता, आयुक्त बालाजी खतगावकर, कंत्राटदार जे कुमार कंपनीचे नलीन गुप्ता, पालिकेचे शहर अभियंता शिवाजी बारकुंड व कार्यकारी अभियंता दीपक खांबित आदींसह सरनाईकांनी नुकतीच या मार्गाची पाहणी केली.
केवळ दोनच उड्डाणपूल बांधण्याऐवजी एकच उन्नत पूल बांधणे सोयीस्कर ठरणार आहे. काशिमीरा उड्डाणपुलाला जोडून हा उन्नत पूल मुख्य छत्रपती शिवाजी महाराज मार्गावरुन थेट भार्इंदर जुने फाटकपर्यंत आणावा व तेथून रेल्वेमार्ग ओलांडून भार्इंदर पश्चिमेस जुन्या फाटकाजवळ खाली उतरवावा. मधल्या प्रमुख नाक्यांवर चढणे उतरण्यासाठी उन्नत पुलावर मार्गिका असावी.
यामुळे भविष्यातील कोंडी निकाली निघेलच, शिवाय भार्इंदर पश्चिमेला जाण्यासाठी आणखी एक उड्डाणपुलाचा पर्याय निर्माण होईल, असे यावेळी सरनाईकांनी सांगितले. उन्नत मार्ग कुठून सुरू होईल व तो कुठे संपेल, त्याची रचना कशी असावी, याची चर्चा व जागेवर पाहणी करण्यात आली. याचा खर्चसुद्धा मेट्रोसोबतच एमएमआरडीएने करावा.
एमएमआरडीएचे अधिकारी याबाबतचा तांत्रिक तसेच आवश्यकतेचा विचार करून प्रस्ताव बनवतील. एमएमआरडीएच्या अतिरिक्त आयुक्तां कडे होणाºया पुढील बैठकीत याबाबत निर्णय होईल, असे ते म्हणाले.
पर्यायी मार्गांच्या वापरास प्रोत्साहन
मेट्रोच्या कामामुळे मुख्य मार्गावर होणारी वाहतूककोंडी पाहता शहरातील अंतर्गत पर्यायी मार्ग वाहतुकीसाठी खुले ठेवणे आणि नागरिकांना त्या मार्गांचा वापर करण्यास प्रोत्साहित करणे आवश्यक आहे.
त्यासाठी महापालिका, पोलीस यांची बैठक घेण्याची मागणी केल्याचे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले.