‘चला वाचायला शिकू या’चा फायदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 03:23 AM2018-07-16T03:23:13+5:302018-07-16T03:23:16+5:30
राधाबाई साठे माध्यमिक विद्यालय या मराठी शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या दरवर्षी ७५ ने घटू लागली होती.
- जान्हवी मोर्ये
डोंबिवली : राधाबाई साठे माध्यमिक विद्यालय या मराठी शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या दरवर्षी ७५ ने घटू लागली होती. त्यावर मात करण्यासाठी शाळेने ‘चला वाचायला शिकू या’ हा उपक्रम राबवताच पटसंख्येत यंदाच्या वर्षी शंभरने वाढ झाली आहे.
शाळेचे माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक किशोर तळेले म्हणाले, ‘विद्यार्थ्यांची घटत जाणारी संख्या आमच्यासाठी चिंतेची बाब होती. पूर्वी शाळेची वेळ शनिवारी सकाळी ७ ते १०.४५ अशी होती. दुपारचे सत्र लगेचच ११ वाजता सुरू होत होते. या वेळेत बदल करून दुपारचे सत्र इतर दिवशीप्रमाणे १२.२० असे केले. सकाळची शाळा सुटल्यानंतर मध्ये जो एकदीड तासाचा वेळ मिळू लागला, त्याचा उपयोग विद्यार्थ्यांचे विषय पक्के करून घेण्यासाठी करू लागलो. आमच्या शाळेत पाचवी, सातवी आणि आठवीत नवीन विद्यार्थी येतात. यापैकी काही विद्यार्थ्यांना नीट वाचता येत नाही. अशा मुलांसाठी ‘चला वाचायला शिकू या’ हा उपक्रम सुरू केला. तसेच पालकांचे समुपदेशन शाळेतर्फे वारंवार केले जाते. यादरम्यान इंग्रजी माध्यमाची एक शाळा बंद पडली. त्यामुळे त्या पालकांनी आपल्या पाल्याला मराठी माध्यमात प्रवेश घेतला. विद्यार्थ्यांच्या संख्यावाढीस त्याचा फायदा झाला.’
‘शाळेतर्फे समाजसेवा शिबिर घेण्यात येते. पालक, विद्यार्थी असे सर्वच जण यात सहभागी होतात. सकाळी मुले गावाची स्वच्छता करतात. दुपारी जेवणानंतर सांस्कृतिक कार्यक्रम होतात. या शिबिरांमुळे मराठी माध्यमाचे महत्त्व पालकांपर्यंत पोहोचवता येते. शाळेतर्फे परिसरातील शाळांमध्ये जाऊन विज्ञानाच्या गमतीजमती सांगितल्या जातात. हा उपक्रम डिसेंबर ते फेबु्रवारीपर्यंत चालतो. २८ फेबु्रवारीला या उपक्रमाची सांगता विज्ञानमेळा घेऊन साठे विद्यालयात केली जाते. या सांगता समारंभात विद्यार्थ्यांना विज्ञानातील गमतीजमती सांगितल्या जातात’, असे तळेले म्हणाले.
>आमच्या घरात कुणालाही इंग्रजी येत नाही. त्यामुळे मुलांना कोण शिकवणार, हा प्रश्न होता. मराठी माध्यमात शिकत असल्याने आम्ही अभ्यास घेऊ शकतो. इंग्रजी माध्यमाची फी खूप असल्याने ती आम्हाला परवडण्यासारखी नाही. आमच्या मुलांना खाजगी क्लास लावलेला नाही. काही न समजल्यास शिक्षकही पुन्हा समजून सांगतात. आमची मुले शिक्षण घेत आहे, हीच आमच्यासाठी समाधानाची बाब आहे.
- कमल परब, पालक