जमत नसेल तर बदली करून घेण्याचा सल्ला; महापालिका आयुक्तांना राज्यमंत्र्यांचे खरमरीत पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2019 12:01 AM2019-10-31T00:01:10+5:302019-10-31T06:21:05+5:30

डोंबिवलीतील स्कायवॉक व अत्यंत वर्दळीच्या रेल्वेस्थानक परिसरात बेकायदा फेरीवाल्यांचा उपद्रव सहनशक्तीच्या पलिकडे गेला आहे.

Advice on transfer if you do not agree; State Minister's letter to the Municipal Commissioner | जमत नसेल तर बदली करून घेण्याचा सल्ला; महापालिका आयुक्तांना राज्यमंत्र्यांचे खरमरीत पत्र

जमत नसेल तर बदली करून घेण्याचा सल्ला; महापालिका आयुक्तांना राज्यमंत्र्यांचे खरमरीत पत्र

Next

डोंबिवली : फेरीवाल्यावर झालेला प्राणघातक हल्ला, तसेच सोमवारी दोन गटांतील हाणामारीनंतर आता राजकीय पक्षांना जाग आली आहे. राज्यमंत्री व भाजपचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र चव्हाण यांनी फेरीवाल्यांचे समूळ उच्चाटन करण्याकडे लक्ष वेधताना जर हे प्रशासनाला जमत नसेल तर अशा कुचकामी प्रशासनाचे प्रमुख म्हणून आपण बदली करून घ्यावी, असे खरमरीत पत्र आयुक्त गोविंद बोडके यांना पाठविले आहे. दुसरीकडे फेरीवाला अतिक्रमणावर अवमान याचिका दाखल करण्याच्या बाता करणाऱ्या मनसेनेही पदपथावरील अतिक्रमण हटविण्यासाठी प्रशासनाला दोन दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे.

१४ आॅक्टोबरला व्यवसायासाठी रस्त्यावर बसण्याच्या जागेवरून सलाउद्दीन शेख याने जाफर इंद्रिसी याच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. यानंतर सोमवारी पुन्हा फेरीवाल्यांच्या दोन गटांत राडेबाजी झाली. महत्त्वाचे म्हणजे उच्च न्यायालयाने मनाई केलेल्या हद्दीत हा प्रकार घडला. या मारहाणीप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असताना राजकीय पक्षांनी या संदर्भात केडीएमसी प्रशासनावर झोड उठविली आहे. चव्हाण यांनी बोडके यांना खरमरीत पत्र पाठवून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

डोंबिवलीतील स्कायवॉक व अत्यंत वर्दळीच्या रेल्वेस्थानक परिसरात बेकायदा फेरीवाल्यांचा उपद्रव सहनशक्तीच्या पलिकडे गेला आहे. पूर्वेतील भागात फेरीवाल्यांच्या आपापसातील हाणामारीच्या घटनेने तर महापालिका प्रशासनाची पोलखोल झाली असल्याचे चव्हाण यांनी पत्रात नमूद केले आहे. चव्हाण यांनी बोडके यांच्यावरही तोफ डागली आहे. महापालिका प्रशासनाचे प्रमुख या नात्याने फेरीवाल्यांविरोधात कठोर भूमिका आपण घेतच नसल्याचे या घटनेच्या निमित्ताने स्पष्ट झाले आहे. आपल्या बोटचेप्या व कृतीशून्य प्रशासनाचा त्रास कल्याण-डोंबिवलीतील नागरिकांना वारंवार सोसावा लागत आहे. बेकायदा फेरीवाल्यांचे समूळ उच्चाटन आपल्या प्रशासनाला जमत नसेल तर अशा कुचकामी प्रशासनाचे प्रमुख या नात्याने आपण बदली करून घ्यावी हे उत्तम, अशा शब्दांत चव्हाण यांनी बोडके यांना पत्रातून खडेबोल सुनावले आहेत. महापालिका प्रशासन, कर्मचारी, अधिकारी यांच्या फेरीवाल्यांशी असलेल्या असलेल्या घनिष्ट अर्थपूर्ण संबंधामुळे राडेबाजीसारखी प्रकरणे घडतात, असाही आरोप त्यांनी केला आहे.

...तर हाताने ‘बोलू’: उच्च न्यायालयाने मनाई केलेल्या हद्दीत राजरोसपणे सुरू असलेल्या फेरीवाला अतिक्रमणावर केडीएमसीविरोधात अवमान याचिका दाखल करू, असा इशारा मनसेने दिला होता. परंतु, कृतीअभावी त्या केवळ बाता ठरल्या असताना आता सोमवारच्या फेरीवाला हाणामारीप्रकरणी मनसेला पुन्हा जाग आली आहे. रस्ते साधन सुविधा व अस्थापना मनसे डोंबिवली शहर अध्यक्ष ओम लोके आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी पदपथावर अतिक्रमण करणाºया फेरीवाल्यांसह व्यापाऱ्यांना मनसे स्टाइल इशारा दिला आहे. पदपथ रिकामी करा, असे आज तोंडाने सांगतोय पण पुढे हाताने ‘बोलू,’ अशा शब्दांत सुनावले आहे.

आमची कारवाई सुरूच असते : दोन गटांत हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याचे काम पोलिसांचे असते आमचे नाही. आमची अतिक्रमणाविरोधातील कारवाई नेहमीच सुरू असते. फेरीवाला धोरणाला फेरीवाला संघटनांचा विरोध आहे, त्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता आणि दिवाळीमुळे धोरणाची अंमलबजावणी करता आलेली नाही. परंतु, येत्या आठ ते दहा दिवसांत धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने ठोस कृती होईल, असा दावा करताना आयुक्त गोविंद बोडके यांनी राज्यमंत्र्यांच्या पत्राबाबत मात्र भाष्य करणे टाळले.

Web Title: Advice on transfer if you do not agree; State Minister's letter to the Municipal Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.