उल्हासनगरमध्ये वकिलांचे कामबंद आंदोलन; कामकाज ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 12:03 AM2019-09-14T00:03:36+5:302019-09-14T00:03:42+5:30
पोलीस अधिकाऱ्याकडून मारहाण, तातडीने कारवाई करण्याची केली मागणी
उल्हासनगर : वकील सागर वासवानी यांना मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर सुराडकर यांनी मारहाण केल्याच्या निषेधार्थ वकील संघटनेने बुधवारपासून कामबंद आंदोलन सुरू केले. सुराडकर यांच्यावर कारवाई होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार संघटनेचे अध्यक्ष अॅड. छोटू पॅथोलिया यांनी व्यक्त केला आहे.
उल्हासनगरमधील मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुराडकर यांच्याविरोधात वकील संघटना आक्रमक झाली आहे. वकिलाला मारहाण केल्याचा निषेध वकील संघटनेने करून बुधवारपासून कामबंद आंदोलन सुरू केले. गेल्या आठवड्यात वासवानी यांना एका सिव्हीलप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावले होते. त्यावेळी सुराडकर व वासवानी यांच्यातील चर्चेच्यावेळी सुराडकर यांनी कानशिलात मारल्याचा आरोप वासवानी यांनी केला.
याबाबत तालुका वकील संघटनेने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे दाद मागितली आहे. तसेच सुराडकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. पोलीस अधिकारी सुराडकर यांच्याविरोधात अनेक तक्रारी असल्याचेही वकील संघटनेचे म्हणणे आहे. सुराडकर यांच्या म्हणण्यानुसार वासवानी यांच्याविरोधात त्यांच्या एका नातेवाइकांनी तक्रार केली. त्याप्रकरणी चौकशीसाठी बोलावण्यात आले होते.
चौकशीदरम्यान वासवानी बॅग टाकून पोलीस ठाण्यातून पळून गेले. अखेर, नातेवाइकांच्या तक्रारीवरून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. त्यांना मारहाण झाल्याचा आरोप चुकीचा व खोटा असून तक्रार आल्यानंतर त्याची खातरजमा करण्याची जबाबदारी पोलिसांची आहे.
त्यामध्ये कोणीही अडथळा आणू नये, असेही सुराडकर म्हणाले. सुराडकर व उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जावळे यांच्या कार्यपद्धतीविरोधात शहरात असंतोष निर्माण झाला असून विधानसभा निवडणुकीपूर्वी दोघांच्या बदलीची मागणी शहरात जोर धरू लागली आहे.
गुन्हेगारीवर अंकुश, अधिकाºयांबाबत नाराजी
पोलीस उपायुक्त प्रमोदकुमार शेवाळे यांना विधानसभा निवडणुकीपूर्वी पोलीस परिमंडळातील गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यात यश आले. मात्र, मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर सुराडकर व उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जावळे यांच्या कार्यपद्धतीवर नागरिकांत नाराजी आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन्ही अधिकाºयांच्या बदलीची मागणी होत आहे.