सुरक्षा बोर्डाच्या कर्मचाऱ्यांची वेतनाअभावी परवड !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:43 AM2021-09-03T04:43:27+5:302021-09-03T04:43:27+5:30
कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सुरक्षा विभागातील बोर्डाच्या कर्मचाऱ्यांना जुलै महिन्याचे वेतन अद्याप मिळालेले नाही. ऑगस्ट महिन्याचा पगार सप्टेंबर ...
कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सुरक्षा विभागातील बोर्डाच्या कर्मचाऱ्यांना जुलै महिन्याचे वेतन अद्याप मिळालेले नाही. ऑगस्ट महिन्याचा पगार सप्टेंबर महिन्याच्या मध्यात होण्याची शक्यता असल्याने वेतनाअभावी त्यांची परवड सुरू आहे. तोंडावर आलेला गणेशोत्सव वेतनाविना साजरा करायचा कसा? असा प्रश्न या कर्मचाऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
महाराष्ट्र सुरक्षा बोर्डाचे ३४ कर्मचारी केडीएमसीने घेतले आहेत. महापालिका क्षेत्रात हे कर्मचारी सुरक्षेची जबाबदारी सांभाळत आहेत. या बोर्डाच्या सुरक्षारक्षकांना १९ ते २० हजारांच्या आसपास वेतन मिळत असले तरी, त्यांच्या हातात १६ ते १७ हजारांपर्यंतच वेतन पडते. वेतन महिन्याच्या १५ तारखेपर्यंत मिळते. परंतु जुलै महिन्याचे वेतन सप्टेंबर महिना उजाडला तरी मिळालेले नाही. वेतनाची फाइल लेखाविभागाकडे पाठविल्याचे सुरक्षा विभागाकडून सांगितले जात आहे. परंतु तेथील अधिकाऱ्यांना स्वाक्षरी करायला मुहूर्त मिळालेला नाही. ऑगस्ट महिन्याचे वेतन ज्यावेळेला कर्मचाऱ्यांची हजेरी जाईल, तेव्हा मिळेल. तोपर्यंत सप्टेंबरचा दुसरा आठवडा उजाडेल असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे वेतनाविना गणेशोत्सव कसा साजरा करायचा? असा यक्षप्रश्न त्यांना पडला आहे. यासंदर्भात लेखा विभागाशी संपर्क साधला असता त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
-----------------