कब्रस्तानअभावी मुस्लिम बांधवांची परवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:28 AM2021-06-05T04:28:39+5:302021-06-05T04:28:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : डोंबिवली येथे मुस्लिम समाजाची सुमारे ३० हजारांहून अधिक लोकसंख्या आहे. परंतु, एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : डोंबिवली येथे मुस्लिम समाजाची सुमारे ३० हजारांहून अधिक लोकसंख्या आहे. परंतु, एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या पार्थिवाचे दफन करण्यासाठी समाजबांधवांना कब्रस्तानाअभावी कल्याण येथे आठ ते दहा किलोमीटर अंतरापर्यंत पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे डोंबिवलीत मुस्लिम समाजाला कब्रस्तानाकरिता जागा मिळावी, अशी मागणी गुरुवारी सुन्नी मुस्लिम जमात मस्जिद ट्रस्ट आणि कल्याण-डोंबिवली शहर जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्हा उपाध्यक्ष शिबू शेख यांनी केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
कल्याण आणि डोंबिवलीत मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणावर आहे. कल्याण पश्चिमेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवरील टेकडी, तर दुर्गाडी परिसरात तकिया नामक अशी दोनच सार्वजनिक कब्रस्तान आहेत. पूर्वेला आणि डोंबिवलीत एकही कब्रस्तान नाही. गोविंदवाडी येथील विस्थापितांच्या कब्रस्तानचा मुद्दाही अद्याप प्रलंबित आहे. डोंबिवलीत कब्रस्तानासाठी खंबाळपाडा-कांचनगाव येथे जागाही मंजूर करण्यात आली आहे. ती महापालिकेच्या ताब्यातही आलेली आहे. ती जागा मुस्लिम बांधवांसाठी कब्रस्तानासाठी मिळाल्यास मोठी अडचण दूर होईल, याकडे सूर्यवंशी यांचे लक्ष वेधण्यात आले.
गेल्या ३० वर्षांपासून कब्रस्तानासाठी पाठपुरावा सुरू आहे. परंतु, त्याकडे दुर्लक्ष झाल्याचा मुद्दाही यावेळी मांडण्यात आला. मानपाडा, सोनारपाडा, गोळवली, सागाव, विष्णूनगर, रामनगर, आयरेरोड, पाथर्ली आणि कोपरगाव याठिकाणी मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधवांच्या वस्त्या आहेत, पण कब्रस्तानासाठी जागा उपलब्ध नाही, असे सूर्यवंशी यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले.
--------
मुंबईत न्यावे लागला मृतदेह
कोविडकाळात मृतांची संख्या वाढली होती. त्यामुळे कल्याण आणि मुंब्रा येथील कब्रस्तानामध्येही डोंबिवलीमधील मृतांना जागेअभावी दफन करण्यास विरोध केला जात होता. त्यावेळी मृतदेह दफन करण्यासाठी मुंबईत घेऊन जावे लागले. हे एकूणच वास्तव पाहता डोंबिवलीत तातडीने कब्रस्तानासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
-----------------------------