ठाण्यात अफगाणी चरसची तस्करी करणाऱ्यास अटक: ८० लाखांचे चरस जप्त
By जितेंद्र कालेकर | Published: January 25, 2024 06:40 PM2024-01-25T18:40:16+5:302024-01-25T18:40:39+5:30
ठाण्यातील माजीवाडा जंक्शन येथे एक व्यक्ती चरस या अंमली पदार्थाच्या तस्करीसाठी येणार असल्याची माहिती युनिट पाचचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विकास घाेडके यांना मिळाली होती.
ठाणे: अफगाणातून आयात केलेल्या चरस या अमली पदाथार्ची ठाण्यात तस्करी करणाऱ्या अभय पागधरे (४३, रा. डहाणू, जि. पालघर ) या मच्छीमारास ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिट पाचच्या पथकाने अटक केल्याची माहिती पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी गुरुवारी दिली. त्याच्याकडून मोबाईलसह रोकड आणि ८० लाख ८२ हजारांचा आठ किलो ८२ ग्रॅम वजनाचे चरस हस्तगत केले आहे.
ठाण्यातील माजीवाडा जंक्शन येथे एक व्यक्ती चरस या अंमली पदार्थाच्या तस्करीसाठी येणार असल्याची माहिती युनिट पाचचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विकास घाेडके यांना मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे सहायक पोलिस आयुक्त निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक घाेडके, सहायक पोलिस निरीक्षक पल्लवी ढगे पाटील, भूषण शिंदे, उपनिरीक्षक सुनिल अहिरे, हवालदार अजय साबळे, सुशांत पालांडे, माधव वाघचौरे आणि उत्तम शेळके आदींच्या पथकाने २४ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ७.१५ वाजण्याच्या सुमारास माजीवडा येथील आय लव्ह माजीवडा जंक्शन याठिकाणी एका मोटारसायकलीवरुन चरस विक्रीसाठी आलेल्या अभय याला सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून आठ किलो ८२ ग्रॅम चरससह ८१ लाख ४३ हजार ३४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्याच्याविरुद्ध कापूरबावडी पोलिस ठाण्यात एनडीपीएस अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक पल्लवी ढगेपाटील या करीत आहेत.
आठ महिन्यांपूर्वी पालघर ते सिंधूदूर्ग या सागरी किनारी परिसरात मोठया प्रमाणात चरसचा साठा काही नागरिकांना प्लास्टीकमध्ये गुंडाळलेल्या पिशव्यांमध्ये मिळाला होता. यातील काही साठा पोलिसांनी जप्त केला होता. ठाण्यातील अफगाणी चरसमध्येही तेच साम्य असून सहा स्तरांमध्ये ते गुंडाळून पॅकींग केल्याची माहिती विकास घाेडके यांनी दिली.
तीन महिन्यांपूर्वीही कारवाई
ठाणे गुन्हे शाखेच्या वागळे इस्टेट युनिटने तीन महिन्यांपूर्वी श्रीवर्धन येथून चरसच्या तस्करीसाठी आलेल्या एका मच्छीमारास अटक केली होती. अशीच कारवाई पुन्हा ठाण्यात या युनिटने केली आहे. आणखीही मोठया प्रमाणात अफगाणी चरस काही मच्छीमार किंवा समुद्रकिनारी वास्तव्यास असलेल्या नागरिकांकडे असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. हे चरस त्यावेळी समुद्रकिनारी भागात काेणी टाकले, याचा शाेध लागलेला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.