Cocaine Drugs Seized: कोकेनची तस्करी करणाऱ्या अफ्रिकन नागरिकाला ठाण्यात अटक
By जितेंद्र कालेकर | Published: August 4, 2022 07:07 PM2022-08-04T19:07:38+5:302022-08-04T19:08:24+5:30
२४ लाखांचे कोकेन जप्त, वागळे इस्टेट भागात धरपकड
Cocaine Drugs Seized in Thane | लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: अफ्रिकन देशातून मुंबईत कोकेनच्या तस्करीसाठी आलेल्या कोफी चार्लस उर्फ किंग (सध्या रा. साकीनाका, मेट्रो स्टेशन, मुंबई ) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटने अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांनी गुरुवारी दिली. त्याच्याकडून २४ लाख सहा हजारांचे ६० ग्रॅम कोकेनही जप्त केले आहे.
ठाण्यातील वागळे इस्टेट येथील ज्ञानेश्वरनगर भागातील हिंदुस्थान रेसिडेंसी हॉटेल, येथे एक कृष्णवर्णीय व्यक्ती कोकेन या अंमली पदार्थाच्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती घोडके यांना मिळाली होती. त्याआधारे सहपोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, गुन्हे अन्वेषण विभागाचे अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील आणि सहायक पोलीस आयुक्त सरदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घोडके, सहायक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे, अविनाश महाजन, जमादार शशीकांत सालदूर, सुनील अहिरे, हवालदार सुनील रावते, पोलीस नाईक सुनील निकम, तेजस ठाणेकर आणि राहुल पवार आदींच्या पथकाने ३ ऑगस्टला रात्री ८ ४० च्या सुमारास हिंदुस्थान रेसिडेंसी हॉटेल समोरील रस्त्यावर सापळा रचून रिपब्लिक ऑफ आयवोरी कोस्ट या देशातील नागरिक कोफी चार्लस उर्फ किंग याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ६० ग्रॅम वजनाचा कोकेन हा अंमली पदार्थ, एक मोबाइल, रिपब्लिक ऑफ आयवोरी कोस्टचा पासपोर्ट आणि विजा असा २४ लाख सहा हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
९ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी
चार्लस उर्फ किंग हा मूळचा आफ्रिकन देशातील रहिवासी आहे. त्याने त्याच्या एका आफ्रिकन साथीदाराकडून खरेदी केलेल्या कोकेनची तस्करी करण्यासाठी तो ठाण्यात आला होता, अशी कबुलीही दिली आहे. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात एन. डी. पी. एस. कायद्याखाली गुन्हा दाखल झाला आहे. त्याला ९ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. गुन्हे अन्वेषण विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.