केंद्र व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची १२६४ मते बाद
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2019 01:02 AM2019-05-26T01:02:38+5:302019-05-26T01:03:00+5:30
जिल्ह्यातील ठाणे, कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघांतील मतदानाची गुरुवारी ठिकठिकाणी मतमोजणी झाली.
सुरेश लोखंडे
ठाणे : जिल्ह्यातील ठाणे, कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघांतील मतदानाची गुरुवारी ठिकठिकाणी मतमोजणी झाली. ईव्हीएम मतदानयंत्रांतील सर्व मतदान ग्राह्य धरण्यात आले. मात्र, सरकारी सेवेतील काही मतदारांनी पोस्टल बॅलेटपेपरच्या साहाय्याने मतदानाचा हक्क बजावला. परंतु, या बॅलेटपेपरद्वारे मतदानाची पद्धत माहीत नसल्यामुळे काहींनी ते चुकीच्या पद्धतीने केले. यामुळे तिन्ही मतदारसंघांतील पोस्टल बॅलेटपेपरची १२६४ मते बाद ठरवण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.
जिल्ह्यातील ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तिन्ही लोकसभा मतदारसंघांत ६६ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यांना ३० लाख ५७ हजार ८७६ मतदारांनी मतदान केले. यामध्ये सरकारी नोकरीनिमित्त मतदारसंघापासून लांब वास्तव्यास असलेले, सैन्यदलात असलेले आणि परदेशात वास्तव्य असलेले पण या मतदारसंघाचे मतदार असलेले आदींनी पोस्टल बॅलेटपेपर आणि ईटीटीपी या दोन पद्धतीने मतदानाचा हक्क बजावला. यानुसार, नऊ हजार ४११ मतदारांनी या पोस्टल बॅलेटपेपरने मतदानाचा हक्क बजावला आहे. परंतु, यातील एक हजार २६४ मतदारांनी चुकीच्या पद्धतीने मतदान केल्यामुळे त्यांची मते बाद ठरवण्यात आल्याचे मतमोजणीवरून उघडकीस आले आहे. ठाणे लोकसभा निवडणुकीत तीन हजार ८३२ मतदारांनी पोस्टल बॅलेटपेपरने मतदानाचा हक्क बजावला. यातील तीन हजार ३१९ मतदान ग्राह्य धरले. तर, ४५२ मतदारांनी चुकीच्या पद्धतीने मतदान केल्यामुळे त्यांचे मत बाद ठरवण्यात आले, असे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी लोकमतला सांगितले. यातील उर्वरित ६१ मतदारांनी नोटाचा वापर करून २३ उमेदवारांपैकी एकालाही पसंती दिली नाही. याप्रमाणेच कल्याण लोकसभेसाठी दोन हजार ७३७ मतदारांनी पोस्टल बॅलेट पेपरने मतदानाचा हक्क बजावला. त्यातील दोन हजार ३२१ जणांचे मत ग्राह्य धरले.
>भिवंडीत ४३३ कर्मचाऱ्यांचे मत झाले बाद
३७९ मतदारांनी चुकीच्या पद्धतीने मतदान केल्यामुळे त्यांचे मत बाद ठरले आहे. भिवंडी लोकसभेचे मतदार असलेल्या तीन हजार ८३२ मतदारांनी मतदान केले. परंतु, यातील ४३३ जणांचे मतदान बाद केले, तर ४२ जणांनी एकाही उमेदवारास पसंती न देता नोटाचा वापर करून मतदानाचा हक्क बजावला. यामुळे पोस्टल बॅलेटपेपरने मतदान करणाºयांमध्येदेखील मतदानाची जनजागृतीची गरज असल्याचे या चुकीच्या मतदानामुळे उघड झाले आहे. भिवंडी लोकसभेचे मतदार असलेल्या तीन हजार ८३२ मतदारांनी मतदान केले.