कोरोनामुळे १८ वर्षांनंतर दीपोत्सवात खंड, सामान्य ठाणेकरांचा हिरमोड
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2020 01:24 AM2020-10-30T01:24:07+5:302020-10-30T01:25:11+5:30
Thane News : श्रीसाई दहीकाला उत्सव मंडळाने २००२ साली ठाणे पूर्व येथील अष्टविनायक चौक येथे दीपोत्सव या कार्यक्रमास सुरुवात केली. हा कार्यक्रम म्हणजे ठाणेकरांसाठी पर्वणीच असते. दिवाळीत पाडव्याच्या दिवशी रात्री ८ वाजता या कार्यक्रमास सुरुवात होते.
ठाणे : दिवाळी पहाटवर कोरोनाचे सावट असल्याने ठाणे पूर्व येथे आयोजित करण्यात येणाऱ्या दीपोत्सव या नयनरम्य कार्यक्रमात तब्बल १८ वर्षांनी खंड पडणार आहे. कोरोनामुळे हा कार्यक्रम रद्द केला असल्याचे आयोजकांनी सांगितले.
श्रीसाई दहीकाला उत्सव मंडळाने २००२ साली ठाणे पूर्व येथील अष्टविनायक चौक येथे दीपोत्सव या कार्यक्रमास सुरुवात केली. हा कार्यक्रम म्हणजे ठाणेकरांसाठी पर्वणीच असते. दिवाळीत पाडव्याच्या दिवशी रात्री ८ वाजता या कार्यक्रमास सुरुवात होते. एकीकडे आवाजविरहित फटाक्यांची आतषबाजी, रांगोळ्यांच्या पायघड्या, दिव्यांचा झगमगाट या उत्सवात पाहायला मिळत असतो.
ठाणेकर या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत असतात. मात्र कोरोनामुळे या कार्यक्रमाला ठाणेकरांना कोरोनामुळे मुकावे लागणार आहे. या कार्यक्रमाला केवळ ठाण्यातील नव्हे तर शहराबाहेरून रसिक सहभागी होतात. सुरुवातीला हा कार्यक्रम केवळ विभागातील नागरिकांपुरता मर्यादित होता. त्यांनतर मंडळाने सर्व रसिकांसाठी खुला केल्याने दरवर्षी जवळपास २५ ते ३० हजार नागरिक सहभागी होत असतात. १०० ते १५० छोट्या तर १० ते १२ मोठ्या रांगोळ्या काढल्या जातात. तीन ते साडेतीन हजार पणत्या लावल्या जातात. तसेच, अर्धा तास परिसरातील दिवे बंद करून संपूर्ण परिसर ब्लॅकआउट करून अर्धा तास आवाजविरहित फटाक्यांची आतषबाजी केली जाते. हे सर्व दृश्य पाहण्यासाठी हजारो नागरिकांची गर्दी होत असते. कोरोनामुळे दीपोत्सवही रद्द केला असल्याचे मंडळाचे सल्लागार रवींद्र मोरे यांनी सांगितले. सांस्कृतिक कार्यक्रमाला अद्याप शासनाची परवानगी नसल्याने १८ वर्षांनी या कार्यक्रमात खंड पडणार आहे. गेल्यावर्षी दिवाळीत पाऊस झाल्याने दीपोत्सव एक ते दीड महिन्यांनी आयोजित केला होता. या उत्सवाऐवजी नियम पाळून वेगळे काय करता येईल, याबाबत दोन दिवसांनी होणाऱ्या बैठकीत निर्णय होणार असल्याचे मोरे यांनी सांगितले.