अखेर 18 वर्षांनंतर कळवा पोलीस ठाण्याला मिळणार हक्काची जागा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2017 09:03 PM2017-08-29T21:03:37+5:302017-08-29T21:04:05+5:30
गेल्या अनेक वर्षांपासून ठाणेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तेही एका पत्र्याच्या बराकीत सुरू असलेल्या कळवा पोलीस ठाण्याचा कारभार आता स्वत:च्या हक्काच्या वास्तूमध्ये सुरू होणार आहे.
जितेंद्र कालेकर/ठाणे, दि. 29 - गेल्या अनेक वर्षांपासून ठाणेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तेही एका पत्र्याच्या बराकीत सुरू असलेल्या कळवा पोलीस ठाण्याचा कारभार आता स्वत:च्या हक्काच्या वास्तूमध्ये सुरू होणार आहे. ठाणे महापालिका आणि खासगी विकासकाच्या मदतीने सुमारे दोन कोटींच्या खर्चातून बांधण्यात आलेल्या कळवा आणि कासारवडवली पोलीस ठाण्याच्या इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी होणार आहे.
कळवा आणि कासारवडवली या दोन्ही पोलीस ठाण्यांच्या इमारतींचे बांधकाम ठाणे महापालिकेच्या वतीने नुकतेच पूर्ण करण्यात आले. कावेसर आणि पारसिक या दोन्ही सुविधा भूखंडावर या दोन्ही पोलीस ठाण्यांचे बांधकाम करण्यात आले आहे. त्यांचा लोकार्पण सोहळा बुधवारी ३० आॅगस्ट रोजी सायंकाळी ६.१५ वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. कासारवडलीचे प्रत्यक्ष तर कळवा पोलीस ठाण्याचे आॅनलाईन पद्धतीने उद्घाटन होणार आहे. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तर महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे.
‘पोलीस ठाण्यांचा पंचनामा’ या मालिकेद्वारे कळव्यासह ठाण्यातील सर्वच पोलीस ठाण्यांच्या दुर्दशेची मालिका ‘लोकमत’ने दोन वर्षांपूर्वी मांडली होती. याच मालिकेची दखल घेऊन ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीरसिंग आणि तत्कूालीन सहपोलीस आयुक्त व्ही.व्ही. लक्ष्मीनारायण यांनी या पोलीस ठाण्यांचा आढावा घेतला. त्यानुसार, परिमंडळ एकचे तत्कालीन उपायुक्त सचिन पाटील यांनी ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याबरोबर बैठक घेऊन कळवा, डायघर आणि कासारवडवली पोलीस ठाण्यांच्या जागेसाठी पाठपुरावा केला. ठामपाने पोलिसांसाठी आरक्षित जागेवर बांधकाम केले असून त्याबदल्यात संबंधित बिल्डरला जागेचा टीडीआर अर्थात विकास हक्क हस्तांतरित केले आहेत. त्यामुळे पोलिसांना विना मोबदला या पोलीस ठाण्यांचे बांधकाम करुन देण्यात आले आहे. डायघर पोलीस ठाण्याच्या बांधकामाचा काही खर्च महापालिका तर काही खर्च राज्य शासनाने केला आहे.
१८ वर्षानंतर कळव्याला मिळणार जागा
तत्कालीन ठाणे आयुक्तालयात (आता नवी मुंबईत) असलेल्या रबाळे पोलीस ठाण्यातून १९९५ मध्ये निर्मिती झालेल्या कळवा पोलीस ठाण्याचा कारभार कळव्यातील ठामपाच्या शाळा क्रमांक ७१ व ७२ मध्ये १९९९ पर्यंत सुरू होता. त्यानंतर जागेअभावी हद्दीच्या बाहेर म्हणजे आरटीओ कार्यालयाच्या बाजूला असलेल्या पत्र्याच्या बराकीत कामकाज सुरु झाले. खारेगाव येथील एका मॉलच्या बाजूला ठाणे महापालिकेने दिलेल्या सहा गुंठे सुविधा भूखंडावर १२ हजार चौरस फुटांची सहा मजली इमारत नातू बिल्डर्सकडून यांच्याकडून बांधण्यात आली आहे. पहिले दोन मजले पोलीस ठाण्यासाठी तिसºया मजल्यावर कळवा सहायक आयुक्तांचे कार्यालय, चौथा मजला - पोलिसांचे विश्रांतीगृह, पाचव्या मजल्यावर पोलिसांसाठी व्यायामशाळा तर सहाव्या मजल्यावर वरिष्ठ अधिकाºयांचे विश्रांतीगृहाचे नियोजन असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
गैरसोय टळणार
कळवा पोलीस ठाणे आता स्वत:च्या जागेत आणि हद्दीत येणार आहे. पोलीस ठाण्यातील वादही दुसºया पोलीस ठाण्यात नोंद होत होता. नागरिकांना येण्याजाण्याच्या दृष्टीने गैरसोयीचे होते. हा त्रास वाचणार आहे.
लोकमतचा पाठपुरावा
कळवा पोलीस ठाण्याला मिळणार हक्काची जागा असे वृत्त डिसेंबर २०१५ च्या लोकमत मध्ये प्रसिद्ध झाले होते. सततच्या पाठपुराव्यानंतर आज हे वृत्तही खरे ठरले आहे.