तब्बल २२ वर्षांनी पुन्हा रंगणार चांदणं संमेलन; जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्तांसह महापौर लावणार हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2020 01:28 AM2020-02-06T01:28:44+5:302020-02-06T01:29:07+5:30
रंगणार साहित्यिक गप्पा
- प्रज्ञा म्हात्रे
ठाणे : मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या वतीने आयोजित करण्यात येणारे चांदणं संमेलन तब्बल २२ वर्षांनी पुन्हा एकदा ठाण्यात रांगणार आहे. रसिकांच्या आग्रहाखातर ते पुनर्जीवित केले असून साहित्यिक गप्पा, मुलाखती, शब्दमोती, गजल, संगीत, कथा-काव्य स्पर्धा, अनुभवकथन अशा विविध कार्यक्रमांनी ते रंगणार आहे. यावेळी झुणकाभाकर, चहा, दुधाचादेखील आस्वाद श्रोत्यांना घेता येणार आहे.
मराठी ग्रंथसंग्रहालयाचे तत्कालीन अध्यक्ष श्याम फडके यांनी साधारण १९७७-७८ साली चांदणं संमेलन ही संकल्पना राबवली. पाच ते सात वर्षे हे संमेलन सुरू राहिले आणि त्यानंतर बंद पडले. १९८८ साली शशी जोशी हे मराठी ग्रंथसंग्रहालयाचे तत्कालीन अध्यक्ष, कार्याध्यक्ष असताना त्यांनी या संमेलनाला पुनर्जीवित केले आणि साधारण १९९७ सालापर्यंत ते सुरू राहिले. संग्रहालयाच्या गच्चीवर ते भरविले जात होते.
चंद्रप्रकाशात बसून कलाकारांबरोबर गप्पा, त्यांच्यासह रसिक श्रोत्यांचे सादरीकरण, गप्पा, स्पर्धा, कलाकारांच्या आठवणी, त्यांचे किस्से, एखाद्या कार्यक्रमातील प्रसंग ते कथन करीत असत. आम्ही त्यावेळी या संमेलनाला प्रेक्षकांचा सहभाग असलेले संमेलन म्हणत असत. त्यावेळच्या चांदणं संमेलनाचे माजी कार्यवाह, लेखक मकरंद जोशी यांनी या संमेलनाच्या आठवणींना उजाळा देताना सांगितले. यावेळी विनोदकथन स्पर्धा, असंबद्ध बोलणे, विडंबन काव्य स्पर्धा या विविध स्पर्धांबरोबर फिशपॉण्ड कार्यक्रमदेखील होत असे, असे जोशी यांनी अधिक माहिती देताना सांगितले.
या मातब्बरांनी लावली आहे हजेरी
या संमेलनाला व.पु. काळे, प्रभाकर पणशीकर, सुरेश खरे, सुहास शिरवळकर, यशवंत देव आणि करुणा देव यासारख्या अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली आहे. या संमेलनाचेही स्वरूप सारखेच असणार आहे, असे संग्रहालयाचे अध्यक्ष विद्याधर वालावलकर यांनी सांगितले.
यंदाचे संमेलन १५ फेबु्रवारीला
यंदा ते १५ फेब्रुवारी रोजी मराठी ग्रंथसंग्रहालयात असणार आहे. या संमेलनाला जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, महापौर नरेश म्हस्के, ज्येष्ठ व्यंगचित्रकार विवेक मेहेत्रे, व्याख्यात्या धनश्री लेले, ज्येष्ठ कवी अरु ण म्हात्रे आदी मान्यवर सहभागी होणार आहेत.