दिव्यात २४ तासांपासून अंधार, नागरिक झाले हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2020 12:59 AM2020-03-07T00:59:59+5:302020-03-07T01:00:04+5:30
कळव्यात वीज खंडित होण्याचा शॉक ताजा असतानाच आठवड्याच्या शेवटी दिवा, शीळ परिसरात ऐन परीक्षेच्या काळात गुरुवारी रात्री ८ वाजल्यापासून शुक्रवार संध्याकाळपर्यंत अंधार आहे.
ठाणे : कळवा, मुंब्रा आणि दिवा, शीळ भागात १ मार्चपासून टोरंटची वीज सुरू झाली. मात्र, पहिल्याच दिवशी कळव्यात वीज खंडित होण्याचा शॉक ताजा असतानाच आठवड्याच्या शेवटी दिवा, शीळ परिसरात ऐन परीक्षेच्या काळात गुरुवारी रात्री ८ वाजल्यापासून शुक्रवार संध्याकाळपर्यंत अंधार आहे. याचा सर्वाधिक फटका १० वीच्या विद्यार्थ्यांना बसला.
बहुसंख्य नागरिकांना विजेचे खाजगीकरण झाल्याची माहिती नसल्याने ते महावितरणकडे विचारणा करीत होते. मात्र, कोणाकडूनही अपेक्षित अशी उत्तरे न मिळाल्याने रहिवाशांमध्ये संतापाचे वातावरण होते.
>एका वाहिनीवर ही समस्या निर्माण झाली होती. परंतु, दुरुस्ती करूनही वारंवार वीजपुरवठा खंडित होत होता. त्यामुळे आता जादा मॅन पॉवर लावून तिची दुरुस्ती सुरू केली आहे. सायंकाळी वीजपुरवठा सुरळीत होईल. टोरंटकडून या भागात काम सुरू झाल्याने काहींकडून जाणूनबुजून हे कृत्य केले जात आहे.
- चेतन बिजलानी, माहिती जनसंपर्क अधिकारी, टोरंट