अखेर ४० तासानंतर खडवली नदीत बुडालेल्या दोन तरुणांचे सापडले मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2021 06:09 PM2021-03-06T18:09:19+5:302021-03-06T18:10:04+5:30
Khadavali News : नाफिस शेख, इम्तियाज, मुन्नाभाई, शफिक सय्यद हे चार मित्र भिवंडी येथून खडवली येथील भातसा नदीवर गुरुवारी आंघोळीसाठी आले होते.
उमेश जाधव
टिटवाळा - खडवली येथील भातसा नदी नदीवर गुरुवारी आंघोळीसाठी भिंवडी येथून आलेल्या चौघा मित्रांपैकी दोन तरुण बुडून बेपत्ता झाले होते. पोलीस, अग्निशमन व जीव रक्षक दलातर्फे त्यांचा शोध सुरू होता. अखेर ४० तासांच्या अथक प्रयत्नानंतर शनिवारी दोन्ही तरुणांचे मृतदेह सापडले असल्याची माहिती टिटवाळा पोलिसांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाफिस शेख, इम्तियाज, मुन्नाभाई, शफिक सय्यद हे चार मित्र भिवंडी येथून खडवली येथील भातसा नदीवर गुरुवारी आंघोळीसाठी आले होते. सायंकाळी ५ च्या सुमारास शफिक सय्यद (३३) व नाफीस शेख (४०) हे दोघे भातसा नदीपात्रात आंघोळीसाठी उतरले. पाण्यात उतरलेले शाफिक सय्यद व नाफीस शेख यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले. त्यांचा शोध घेतला असता ते सापडले नाहीत. म्हणून सोबत आलेल्या मित्रांनी याबाबत कल्याण तालुका टिटवाळा पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली.
सदर तरुणांना शोधण्यासाठी पोलीस अग्नि,अग्नीशमन दल, गावातील पोहणाऱ्या तरुणांची टीमन व जीव रक्षक दलाच्या वतीने दोन दिवस पाण्यात खूप वेळ शोध घेतला. पण हे दोन्ही तरुण सापडले नाहीत. मात्र, शनिवारी ४० तासा नंतर सकाळी ७ वा. शफिक सय्यद याचा मृतदेह कपील पाटील यांच्या फार्म हाऊस लगत सापडली तर नाफिस शेख याचा मृतदेह ९ वा. बुडालेल्या जागी सापडला. सदर मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी गोवेली ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले असल्याची माहिती हेडकॉन्स्टेबल गोविंद कोर यांनी दिली. सदरचे मृतदेह शोधण्यासाठी घटनास्थळी पोलिस निरीक्षक राजू वंजारी, पो.उपनिरिक्ष कमलाकर मुंढे, पो.ना. संदिप तांडेल, पो.ना. गंगाराम तांबडा, अग्निशमन व जीवन रक्षक दलाचे जवान यांनी अथक मेहनत घेतली.