अखेर त्यांचे विजेचे स्वप्न झाले साकार, भाईंदरच्या गोराईतील आदिवासींचा जामझाड पाडा उजळला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2019 01:15 AM2019-05-06T01:15:57+5:302019-05-06T01:16:11+5:30

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या झगमगाटात गोराई गावात वसलेला आदिवासींचा जामझाड पाडा मात्र अंधारातच हरवला होता. स्वातंत्र्याच्या ७१ वर्षांनंतर या पाड्यात वीजपुरवठा झाला

After 71 years electricity came in Bhayander's gorai jamzad pada | अखेर त्यांचे विजेचे स्वप्न झाले साकार, भाईंदरच्या गोराईतील आदिवासींचा जामझाड पाडा उजळला

अखेर त्यांचे विजेचे स्वप्न झाले साकार, भाईंदरच्या गोराईतील आदिवासींचा जामझाड पाडा उजळला

googlenewsNext

- धीरज परब
मीरा रोड - देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या झगमगाटात गोराई गावात वसलेला आदिवासींचा जामझाड पाडा मात्र अंधारातच हरवला होता. स्वातंत्र्याच्या ७१ वर्षांनंतर या पाड्यात वीजपुरवठा झाला आणि शुक्रवारी पाड्यातील घर अन् घर वीजेच्या दिव्यांनी उजळून निघाले. घरच नव्हे तर आपले आयुष्यच उजळून निघाल्याची भावना यावेळी प्रत्येकाच्या मनात होती. पारंपरिक वाद्य वाजवत आदिवासींनी वीजेचे जल्लोषात स्वागत केले. दीड वर्षांपासून अथक पाठपुराव्यानंतर वीजेचे स्वप्न साकारल्याची भावना आदिवासींनी यावेही व्यक्त केली.
भार्इंदरच्या उत्तन - गोराई मार्गापासून सुमारे तीन किमी आत डोंगराच्या खाली वसलेला जामझाड हा ५२ उंबरठ्यांचा आदिवासी पाडा. मुंबईच्या हद्दीत आणि भार्इंदरच्या वेशीवर असलेल्या या पाड्यात जेमतेम दोनशेची लोकवस्ती आहे. भार्इंदर येथील प्रसिद्ध केशवसृष्टी - रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आणि रामरत्नसारखी आलिशाळा याच भागात आहे. देशाच्या ज्युडिशीयल अकादमी पासून हा पाडा हाकेच्या अंतरावर आहे. लोकप्रतिनिधी, न्यायपालिका आणि प्रशासनाच्या शिबिरांमधून देश घडवण्याच्या विचारांसह सत्ताकारणाची खलबते होत असली तरी उशाशी असलेला हा पाडा मात्र पाणी, वीज, शिक्षण, वैद्यकीय सुविधा अशा मूलभूत गरजांपासूनच वंचित राहिलेला आहे.
या भागातील मोठी डोंगरी, छोटी डोंगरी, मुंडा पाडा, बाबर पाडा, बोरकरपाडा या आदिवासी पाड्यांमध्ये २००३ मध्येच वीज आली. पण जामझाड पाडा मात्र विजेपासून वंचित होता. नेहमीप्रमाणे निवडणूक आली की वीज, पाणी देऊ अशी आश्वासनेच या पाड्यातील लोकांना मिळायची. वीज तर नाहीच पण, पाणी देखील एका डबक्यातून भरावे लागायचे. हल्ली कुठे लायन्स क्लबने एक बोअर मारून दिल्याने शुध्द पाणी मिळते आहे. शिक्षकच नसल्याने शिकायची सोय नाही. शिक्षणासाठी गोराई किंवा मनोरी गावात जायचे. त्यासाठी घरापासून रोजची जवळपास ३ किमीची पायपीट आणि मग मिळेल ते वाहन पकडून शाळा गाठायची. घरात कोणी आजारी पडले तरी तरी वैद्यकिय सुविधेसाठी गोराई वा उत्तनला जावे लागते. आदिवासी म्हणून जातीचे दाखले नाहीत.
काहींना मजुरी - रोजगार चांगला मिळाला म्हणून घरे बांधली. पण वीज, पाणी नाही. ७ -८ कुटुंबांनी जास्त पैसे मोजत लांबून वीज पुरवठा घेतला. पण बहुतांश पाडा तसा अंधारातच. मनसैनिक असलेली सुषमा दवडे ही मोठी डोंगरी पाड्यात सून म्हणून आली आणि या ९ वी शिकलेल्या सुनेने आपल्या सासरच्या मंडळींना त्यांच्या हक्काच्या मूलभूत सुविधा मिळवून देण्याचा चंग बांधला. बोरिवलीतील मनसेचे शाखाध्यक्ष महेश नर सह पाड्यातील चंदू परेड, सुनिता परेड आदी लोकांची साथ मिळत गेली. नोव्हेंबर २०१७ पासून पाड्यातील विविध सुविधांसाठी त्यांनी पाठपुरावा सुरु केला होता.
स्थानिक आमदार व पालकमंत्री विनोद तावडे यांना मंत्रालयात भेटण्यासाठी म्हणून पहिल्यांदा आदिवासी भगिनी - बांधवांना घेऊन दवडे ह्या मंत्रालयात गेल्या. त्यावेळी अदिवासींचे पोषाख बघून आतच सोडले नाही. नंतर काहींना आत सोडले. तावडेंनी समस्या सोडवण्यासाठी जातीने पुढाकार घेतल्याचे दवडे यांनी सांगितले. याचबरोबर खा. गोपाळ शेट्टी, स्थानिक आजी - माजी नगरसेवकांकडे पाठपुरावा केल्यावर त्यांनी सहकार्य केले. शुक्रवारी जोडणीचे काम पूर्ण झाले, वीज पुरवठा सुरु करताच दिव्यांनी घरे उजळली आणि पाड्यातील रहिवाशांनी एकच जल्लोष केला. ढोल - ताशे आणि पारंपरिक वाद्य वाजवून वीजेचे स्वागत केले. जागा मंजूर होऊन उपकेंद्र झाले की वीजेचा जास्त भार घेणे शक्य होणार आहे.

पाठपुराव्याला मिळाले यश

थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना सुध्दा पत्र पाठवले. पंतप्रधान कार्यालयातुन त्याचे उत्तर आले. त्या अनुषंगाने प्रकाशगड येथे गेलो असता तेथील अधिकारी पांडुरंग पाटील यांनी जामझाड पाडा आपल्या हद्दीत नसल्याचे सांगतानाच संबंधित वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांशी गाठ घालून दिली. वीज उपकेंद्रासाठी जागा हवी होती.
महसुलमंत्री पासुन जिल्हाधिकारी, तलहसिलदार, तलाठीकडे पाठपुरावा केला. लोकप्रतिनिधींनी सुध्दा पत्रं दिली. वीज कंपनीचे महाव्यवस्थापक अधिकारी सतीश कसबे यांनी खूपच सहकार्य केल्याचे दवडे म्हणाल्या.
वीजेच्या उपकेंद्रासाठी अद्याप जागा मंजूर झाली नसली तरी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांनी सरकारी जागेतून केबल टाकायला परवानगी दिली. त्यासाठीचे ८० हजार रुपये शुल्क वीज कंपनीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे भरले आहेत. अदानी वीज कंपनीने येथील वसंत स्मृती वृध्दाश्रमा पासुन जोडणी घेऊन केबल टाकण्यासह प्रत्येक घरास वीज जोडणी आणि मीटर बसवणे आदी काम दीड महिन्यात पूर्ण केले.

शुक्रवारचा दिवस आमच्यासाठी आयुष्यातील खºया अर्थाने दिवाळीचा सण होता. काही वयोवृध्दांनी तर वीज पहिल्यांदाच पाहिली. घरातील कामं , मुलांना अभ्यास करणं आता सोपं होणार आहे. वीजेचं मोल काय असतं ते इतक्या वर्षांच्या प्रतीक्षेनंतर वीज आल्याने कळते आहे.
- सुनिता परेड ( स्थानिक आदिवासी )

दीड वर्षांच्या सततच्या पाठपुराव्याला देवाने दिलेला हा आशीर्वाद आहे. सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी यांनी सहकार्य केले. - सुषमा दवडे
(मनसैनिक, स्थानिक आदिवासी)
 

Web Title: After 71 years electricity came in Bhayander's gorai jamzad pada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.