भिवंडीतील निकृष्ट बांधकामाच्या आरोपानंतर एका वर्षाने चौकशीसाठी अधिकारी दाखल
By नितीन पंडित | Published: November 17, 2022 06:01 PM2022-11-17T18:01:54+5:302022-11-17T18:02:57+5:30
राज्य शासनाच्या कृषी विभागाने ४ फेब्रुवारी २०२० रोजी आदेश काढून भिवंडी चाविंद्रा येथील कृषी विभागाच्या फळरोपवाटीका बळकटीकरण योजने अंतर्गत पाण्याची टाकी व बोअरवेल उभारण्यास मंजुरी दिली.
भिवंडी तालुक्यातील चाविंद्रा येथील कृषी विभागाच्या आवारात फलोत्पादन विभागाच्या रोपवाटिकेस पाणी सिंचनासाठी पाण्याची टाकी व बोअरवेल उभारण्यासाठी तब्बल ४० लाख रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या २५ हजार लिटर साठवणूक क्षमता असलेल्या पाण्याच्या टाकी चे काम निकृष्ट व तकलादू केले असून योजना पूर्ण होण्या आधीच ठेकेदारास काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र देत सर्व रक्कम अदा केल्याचा धक्कादायक प्रकार एक वर्षांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष परेश चौधरी यांनी उघडकीस आणून चौकशीची मागणी केली असता तब्बल एक वर्ष नंतर चौकशी अधिकारी सदर कामात झालेल्या भ्रष्टाचारी चौकशी करण्यासाठी बुधवारी भिवंडीत दाखल होत या प्रकरणाची चौकशी करत आहेत.
राज्य शासनाच्या कृषी विभागाने ४ फेब्रुवारी २०२० रोजी आदेश काढून भिवंडी चाविंद्रा येथील कृषी विभागाच्या फळरोपवाटीका बळकटीकरण योजने अंतर्गत पाण्याची टाकी व बोअरवेल उभारण्यास मंजुरी दिली. ठाणे जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत फळ रोपवाटिका असलेल्या ठिकाणी असलेल्या विहिरीतील पाणी २५ हजार लिटर साठवणूक क्षमता असलेली पाण्याची काँक्रीट टाकी उभारणीसाठी ३२ लाख ६४ हजार २१ रुपये व बोअर वेळ बांधण्यासाठी ८ लाख ६३ हजार ४२ रुपये अशा ४१ लाख २७ हजार ६३ रुपये एकत्रित खर्चास मंजुरी देण्यात आली परंतु उभारण्यात आलेली टाकी ही जुन्या काँक्रीट पिलर्स वरच उभारली असून त्यासाठी तकलादू साहित्य वापरात निकृष्ट काम केले असल्याची तक्रार परेश चौधरी यांनी केली होती. टाकीस ठेकेदाराने प्लास्टर न करताच रंगरंगोटी केली असून बोअरवेल लावली नसतानाच कृषी विभागाने ठेकेदारास सर्व रक्कम अदा केल्याचे पुरावे परेश चौधरी यांनी उघडकीस आणले होते.
या बाबत तक्रार केल्यानंतर प्रशासन खडबडून जागे होत त्यांनी या कामाची चौकशी करण्यासाठी ठाणे जिल्हा परिषद लघुपाटबंधारे विभागातील जलसंधारण अधिकारी डी एम जोकार हे बुधवारी जलसंधारण अधिकारी आर पी पिलवानी, पंचायत समिती पाणी पुरवठा विभागाच्या विजया पांढरे व तक्रारदार परेश चौधरी यांच्यासोबत घटनास्थळी चौकशी करण्यसाठी दाखल झाले. तक्रारीच्या अनुषंगाने पाण्याची टाकी, विहिरीची दुरुस्ती,बोअरवेल या सर्वांची पाहणी केली असता ही कामे पूर्ण झाली असून असल्याचे निदर्शनास येत आहे. या कामातील भ्रष्टाचार व निकृष्ट असल्याबाबत जे चौकशीत आढळून येईल ते चौकशी अहवालाच्या माध्यमातून वरिष्ठांकडे सादर करणार असल्याची माहिती चौकशी अधिकारी डीएम जोकार यांनी दिली आहे. तक्रार केल्यानंतर तब्बल एक वर्षाने चौकशी साठी अधिकारी येतात या वरून प्रशासन या तक्रारी बाबत किती गांभीर्य बाळगते हे स्पष्ट होत असल्याचे सांगत रोपवाटीकेत विहीर असून तेथील पाणी थेट रोपवाटीकेत देणे शक्य असताना त्यासाठी लाखो रुपयांची उधळण करीत साठवणूक टाकी फक्त भ्रष्टाचार करण्यासाठी उभारण्यात आल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष परेश चौधरी यांनी शेवटी केला आहे.