आगरी समाजाच्या आक्रमकतेनंतर अखेर 'त्या' हॉटेलच्या पत्रा शेडवर पालिकेची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2019 08:31 PM2019-10-09T20:31:15+5:302019-10-09T20:38:12+5:30
वरसावे नाक्यावरील फाऊंटन हॉटेलच्या मालक-कर्मचारी व घोडबंदर ग्रामस्थांमधील दंगलीनंतर आक्रमक झालेल्या आगरी समाजामुळे अखेर महापालिकेने आज बुधवारी हॉटेलच्या आवारातील बेकादेशीर शेडचे बांधकाम पाडुन टाकले.
मीरारोड - वरसावे नाक्यावरील फाऊंटन हॉटेलच्या मालक-कर्मचारी व घोडबंदर ग्रामस्थांमधील दंगलीनंतर आक्रमक झालेल्या आगरी समाजामुळे अखेर महापालिकेने आज बुधवारी हॉटेलच्या आवारातील बेकादेशीर शेडचे बांधकाम पाडुन टाकले. तसेच हॉटेलच्या मूळ परवानगीसह वाढीव पक्काया बांधकामाबाबत पालिकेने नोटीस बजावली असुन शुक्रवारी सुनावणी ठेवली आहे.
शुक्रवारच्या मध्यरात्रीनंतर काशिमीरा पोलीस ठाणे हद्दीतील वरसावे नाका येथे असलेल्या फाऊंटन हॉटेलवर पान खाण्यासाठी गेलेल्या घोडबंदर गावातील तरुणांना त्यांची दुचाकी उभी करण्यावरुन हॉटेलचे बाऊंसर, रखवालदार आदींनी शिवीगाळ करत दमदाटी, मारहाण केली. याची माहिती गावात कळताच गावातील रहिवाशी हॉटेलवर गोळा झाले. तर हॉटेलचे कर्मचारी देखील मोठ्या संख्येने जमले होते. वादावादी वाढत जाऊन त्याचे पर्यावसान तुंबळ हाणामारी, दगडफेक, सोडा वॉरच्या बाटल्या फेकण्यात झाले. यात ग्रामस्थांसह एक पोलीस जखमी झाला. पोलीसांनी हॉटेलच्या ३६ जणांना तर गावातील ८ जणांना अटक केली होती.
दरम्यान या घटनेचे पडसाद आगरी समाजात उमटले. सोमवारी शिवसेनेचे प्रताप सरनाईक यांच्यासह उपमहापौर चंद्रकांत वैती, सेना नगरसेवक राजु भोईर, आगरी समाजाचे प्रमुख शांताराम ठाकुर, सुरेश पाटील, सेनेचे जिल्हा प्रमुख प्रभाकर म्हात्रे, केशव घरत, चिंतामण पाटील, राजु ठाकुर तसेच मोठ्या संख्येने पालघर - ठाण्याचे आगरी समाजाचे पदाधिकारी, ग्रामस्थांनी काशिमीरा पोलीस ठाण्याला घेराव घातला होता.
आगरी समाजासह ग्रामस्थांनी, फाऊंटन हॉटेलचा मालक तलाह मुखी भाजपात असुन स्वत: घटनेत सहभागी असताना राजकीय आशीर्वादामुळे पोलीस, पालिका आदी संरक्षण देत असल्याचा आरोप केला होता. सदर हॉटेल सीआरझेड व आदिवासींच्या जागेवर असून बेकायदा बांधकाम आणि खोट्या परवानग्या घेतल्या आहेत. यांचेच दिल्ली दरबार इन हे हॉटेल गॅरेजच्या परवानगीच्या नावाखाली बेकायदा चालले आहे. रात्रभर ही हॉटेलं कशी चालतात? असा सवाल करत या ठिकाणी गैरप्रकार चालत असल्याचे आरोप केले गेले होते.
दरम्यान पालिकेने आगरी समाजाच्या आरोपांची दखल घेत आज बुधवारी हॉटेलच्या आवारात बेकायदेशीर बांधलेली मोठी गेमझोनची शेड जेसीबीने पाडून टाकली. यावेळी काशिमीरा पोलिसांसह महापालिकेचे पथक, बाऊंसर तसेच अन्य प्रभाग अधिकारी उपस्थित होते. शेड बाबत आधीच तक्रार होती व नोटीस दिल्याचे प्रभाग अधिकारी चंद्रकांत बोरसे म्हणाले. हॉटेलच्या पक्कया बांधकामाबाबत देखील हॉटेल मालकास नोटीस दिली असून शुक्रवारी त्याबाबत सुनावणी ठेवली आहे. त्या नंतर अनधिकृत बांधकामाबाबत निर्णय घेऊन कारवाई केली जाईल असे बोरसे म्हणाले.