अखेर मुंब्य्रातील रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 11:45 PM2019-05-21T23:45:28+5:302019-05-21T23:45:31+5:30
फेरीवाले झाले हद्दपार : ठामपाची कारवाई
ठाणे : राजकीय इच्छा शक्ती आणि प्रशासनाचे पाठबळ असेल तर काय होऊ शकते याचे उत्तम उदाहरण सध्या मुंब्य्रातील रस्त्यांकडे पाहिल्यास मिळू शकते. गेली ३० वर्षे फेरीवाल्यांनी व्यापलेल्या येथील मुंबई -पुणे रस्त्याने अखेर मोकळा श्वास घेतला आहे. दोन महिन्यांपासून येथील फेरीवाल्यांवर कारवाई सुरूअसल्यामुळेच आज खऱ्या अर्थाने हा रस्ता मोकळा झाला असून वाहतूककोंडीतूनही मुंब्रावासीयांची सुटका झाली आहे.
फेरीवाला ही संपूर्ण ठाण्याला सतावणारी समस्या आहे. शहरातील स्टेशन परिसर असो किंवा घोडबंदर भाग, वागळेपट्टा आज प्रत्येक रस्त्यावर, फुटपाथवर त्यांचे प्रस्थ वाढलेले दिसत आहे. त्यांना राजकीय पाठबळ मिळत असल्याने कारवाई करतांनासुद्धा प्रशासन फारसे पुढे येतांना दिसत नाही. दुसरीकडे मुंब्य्रासारख्या परिसरात तर कारवाई करतांना अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांना मार सहन करावा लागला आहे.
दोन महिन्यांपूर्वीच अशा प्रकारे कारवाई करणाºया पालिकेच्या एका कर्मचाºयाला जबर मारहाण झाली होती. असे असतांनाही मुंब्य्रातील रस्ते फेरीवाला मुक्त करण्यासाठी पालिकेच्या अतिक्रमण विभागाने जोरदार पावले उचलल्यानेच आणि त्याला राजकीय इच्छाशक्तीचे पाठबळ मिळाल्याने येथील रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे. रमजानचा महिना असतांनाही या भागातील रस्त्यांवर एकही फेरीवाला दिसत नाही. महापालिकेच्या वतीने सांयकाळी सहा ते रात्री ११ वाजेपर्यंत येथे जागता पाहरा सुरू आहे. या काळात नजरचुकीने लागत असलेल्या हातगाड्यांवर कारवाईचा धडाका आजही सुरूच आहे. दोन महिन्यात येथील सुमारे ४ हजाराहून अधिक फेरीवाल्यांवर पालिकेच्या अतिक्रमण विभागाने पोलिसांच्या मदतीने कोणाचीही तमा न बाळगता कारवाई केली आहे.
आतापर्यंत झालेली कारवाई
१ नोव्हेंबर २०१८ ते आजपर्यंत मुंब्य्रातील ४०६४ फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली आहे. तर ४२७१ बॅनर पोस्टर काढण्यात आले असून, ६६ गाळे, ३८० झोपड्या, ६२ इमारती, नव्याने उभ्या राहत असलेल्या ११ प्लिंथचे बांधकामे तोडण्यात आली आहेत. शिवाय ३२ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर ३५३ अंतर्गत अन्य तीन जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
रस्ता झाला मोकळा...
पूर्वी मुंब्रा ते पुढे शीळफाट्याला जाण्यासाठी फेरीवाल्यांनी रस्ता अडविल्यामुळे एक ते दीड तासांचा कालावधी वाहनचालकांना लागत होता. परंतुख आता फेरीवाल्यांवर कारवाई होत असल्याने हा रस्ता मोकळा झाला असून अवघ्या १० मिनिटांत हे अंतर कापणे शक्य झाले आहे.
रुंदीकरणाचाही झाला फायदा
महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी येथील फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले असतांनाच येथील रुंदीकरणाची मोहीम राबविल्याने येथील रस्ता आता चौपदरी झाला आहे. त्यामुळे सुद्धा वाहनांचा वेग वाढला आहे.
राजकीय इच्छा शक्ती असेल तर प्रशासन सुद्धा योग्य पद्धतीने आपले काम करत असते. यामुळे आम्हीही प्रशासनाला या कारवाईत आडकाठी आणली नाही, यामुळेच आज मुंब्य्रातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे.
- जितेंद्र आव्हाड,
स्थानिक आमदार, राष्टÑवादी
फेरीवाल्यांचे पुनर्वसन सुरू
रस्ता फुटपाथ अडवून व्यवसाय करणाºया फेरीवाल्यांसाठी गुलाब पार्क मार्केट हलवून ते मित्तलच्या जागेवर तात्पुरत्या स्वरुपात हलविण्यात आले आहे. शिवाय येथील आणखी एका जागेतही फेरीवाल्यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे. शिवाय ईद येत असल्याने आणखी जागेची मागणी वाढली असल्याने त्यानुसार तन्वरनगर भागात तात्पुरत्या स्वरुपात गाळे उभारण्यात येऊन, त्याठिकाणी वीजेची आणि इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून येथे २९० गाळ्यांचे वाटप केले जाणार आहे.
- महेश आहेर, सहाय्यक आयुक्त, मुंब्रा, प्रभाग समिती