अखेर त्या ९ मेट्रो स्थानकांची नावे सत्ताधाऱ्यांच्या बहुमताने झाली निश्चित
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2017 06:24 PM2017-12-08T18:24:40+5:302017-12-08T18:25:43+5:30
मीरा-भार्इंदर शहरांतर्गत नियोजित मेट्रो मार्गावरील ९ स्थानकांची नावे शुक्रवारच्या महासभेत सत्ताधारी भाजपाच्या बहुमताने निश्चित करण्यात आल्याचे महापौर डिंपल मेहता यांनी जाहिर केले.
राजू काळे
भार्इंदर: मीरा-भार्इंदर शहरांतर्गत नियोजित मेट्रो मार्गावरील ९ स्थानकांची नावे शुक्रवारच्या महासभेत सत्ताधारी भाजपाच्या बहुमताने निश्चित करण्यात आल्याचे महापौर डिंपल मेहता यांनी जाहिर केले. यावेळी सेना व काँग्रेसने परिचित असलेली नावेच मेट्रो स्थानकांना देण्याची सुचना व ठराव मांडला असता तो अल्पमतात गेल्याने तो अमान्य करण्यात आला.
शहरातील नियोजित मेट्रो मार्गावर एमएमआरडीएने ९ स्थानकांचे परिसर निश्चित केले. मात्र नियोजित स्थानकांची नावे निश्चित करण्याची सुचना पालिकेला केली होती. त्यानुसार शुक्रवारच्या महासभेत एमएमआरडीने निश्चित केलेल्या परिसरातील स्थानकांची नावे सुचविण्याचा प्रस्ताव मान्यतेसाठी सादर करण्यात आला होता. त्या अनुषंगाने भाजपाचे सभागृह नेता रोहिदास पाटील यांनी राष्ट्रीय महामार्ग (मुंबई-अहमदाबाद महामार्ग) क्रमांक ८ वरील दहिसर चेकनाका लगतच्या पांडुरंगवाडी व अमर पॅलेस हॉटेल परिसरातील नियोजित स्थानकांना अनुक्रमे पेणकरपाडा व मीरागाव, भार्इंदर पुर्वेकडील छत्रपती शिवाजी महाराज या मुख्य मार्गावरील काशिमिरा वाहतुक बेटालगतच्या झंकार कंपनी येथील स्थानकाला छत्रपती शिवाजी महाराज, मीरारोड येथील साईबाबा नगरपरिसरातील स्थानकाला सरदार वल्लभभाई पटेल, दिपक हॉस्पिटल येथील स्थानकाला नानासाहेब धर्माधिकारी, गोल्डन नेस्ट या छेदमार्गावरील क्रिडा संकुल परिसरातील स्थानकाला महाराणा प्रताप सिंह व इंद्रलोक येथील स्थानकाला नवघर, भार्इंदर पश्चिमेकडील मॅक्सस मॉल परिसरातील स्थानकाला महावीर स्वामी व नेताजी सुभाषचंद्र मैदान परिसरातील स्थानकाला सदानंद महाराज अशी नावे देण्याचा ठराव मांडला. त्याला स्थायी समिती सभापती ध्रुवकिशोर पाटील यांनी अनुमोदन दिले. या ठरावातील काही नावांवर आक्षेप घेत सेनेचे दिनेश नलावडे यांनी साईबाबानगर परिसरातील मेट्रो स्थानकाला प्राचीन ब्रह्मदेव मंदिर असे नाव देण्याची सुचना महापौरांना केली. मात्र त्याला प्रतिसाद न मिळाल्याने सेनेच्या निलम ढवण, काँग्रेसचे जुबेर इनामदार यांनी स्थानकांना परिचित परिसराचीच नावे देण्याची मागणी महापौरांकडे केली. तसेच शहरात जी १८ महसुली गावे आहेत त्यांची नावे देखील स्थानकांना देण्याची सुचना मांडली. परंतु, महापौरांनी त्यांची मागणी व सुचना अमान्य करीत दोन्ही बाजुंच्या सदस्यांना ठराव मांडण्याचे निर्देश देत त्यावर मतदान घेण्याचे आदेश नगरसचिव वासुदेव शिरवळकर यांना दिले. त्यानुसार सत्ताधाय््राांच्या बाजुने रोहिदास पाटील तर विरोधकांच्या बाजुने काँग्रेसचे जुबेर इनामदार यांनी ठराव मांडला. जुबेर यांच्या ठरावाला सेनेचे गटनेते हरिश्चंद्र आमगावकर यांनी अनुमोदन दिले. त्यात साईबाबा नगर परिसरातील स्थानकाला सरदार पटेलऐवजी ब्रह्मदेव मंदिर, क्रिडा संकुल परिसरातील स्थानकाला गोडदेव, मॅक्सस मॉल येथील स्थानकाला महावीर स्वामीऐवजी शहिद भगत सिंग या नावांचा समावेश करण्यात आला होता. दोन्ही बाजुंकडील ठरावांवर पार पडलेल्या मतदानात अखेर पाटील यांचा ठराव बहुमताने मंजुर झाल्याचे महापौरांनी जाहिर केले.