अखेर ओमी कलानी टीमचा युतीला पाठिंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 04:05 AM2019-04-02T04:05:10+5:302019-04-02T04:05:33+5:30
रिपाइंची दांडी : उल्हासनगरात युतीचा मेळावा
उल्हासनगर : ओमी कलानी यांचे मन वळवण्यात शिवसेनेला यश आले असून, ओमी टीमने अखेर युतीला पाठिंबा जाहीर केला आहे. रिजन्सी गार्डन येथील महायुतीच्या मेळाव्याला रिपाइंने मात्र दांडी मारल्याने तर्कवितर्क काढले जात आहेत.
उल्हासनगरच्या मोर्चेबांधणीसाठी कल्याण लोकसभेचे युतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांनी ओमी कलानी, रिपाइंचे गटतट, व्यापारी संघटना, सामाजिक संघटना, साई पक्ष आदींसोबत चर्चा केली. ओमी कलानी यांनी पाठिंबा देण्याचे आश्वासन श्रीकांत शिंदे यांना दिले होते; मात्र रविवारच्या मेळाव्यापर्यंत ओमी यांनी भूमिका स्पष्ट केली नसल्याने, तर्कवितर्क काढले जात होते. दरम्यान, पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मेळाव्यापूर्वी ओमी कलानी यांची भेट घेऊन चर्चा केली; मात्र सोमवारी दोघांच्या उपस्थितीत पाठिंबा देण्याची अट कलानी यांनी घातली होती. त्यानुसार, अखेर आज त्यांनी पाठिंबा घोषित केला. युतीचा मित्रपक्ष असणाऱ्या रिपाइं आठवले गटाने मात्र मेळाव्यावर बहिष्कार टाकला. रिपाइं पदाधिकाऱ्यांना सन्मानजनक वागणूक मिळत नाही, तोपर्यंत रिपाइंचा पाठिंबा नाही, अशी भूमिका शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांनी घेतली. त्यांच्या भूमिकेला पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा देत मेळाव्याकडे पाठ फिरवली. युतीच्या नेत्यांनी रिपाइंच्या नेत्यांना मेळाव्याला येण्याचे आवाहन केले; मात्र पदाधिकाºयांनी भालेराव यांच्याकडे बोट दाखवून मेळाव्याला दांडी मारली.
शिंदे, चव्हाण व आयलानी यांच्यात गुफ्तगू
मेळाव्याच्या व्यासपीठावर एकनाथ शिंदे, रवींद्र चव्हाण व भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी यांच्यात गुफ्तगू चालले होते. त्याकडे सर्वांचे लक्ष असून विधानसभेतील उमेदवारीबाबत आयलानी यांना शब्द दिल्याची चर्चा मेळाव्याच्या ठिकाणी रंगली होती. आयलानी यांना शब्द दिला, तर ओमी कलानी टीमचे काय, असा प्रश्नही त्यामुळे निर्माण झाला.